शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड; सोशल मीडियातून जनहिताचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी

मुक्ताईनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार, पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे आणि जनहिताची कार्ये सोशल मीडिया व डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रावेर लोकसभा क्षेत्रात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्षाचे उपनेते तथा नंदुरबार व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रल्हाद महाजन, रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक योगीराज पाटील, रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख ॲड. चंद्रकांत शर्मा, जिल्हा उपसंघटक अशोक शिंदे, रावेर तालुका प्रमुख प्रमोद कोंडे, मुक्ताईनगर तालुका प्रमुख ॲड. राहुल पाटील तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून या नियुक्त्या करण्यात आल्या.
जळगाव जिल्हा (रावेर लोकसभा क्षेत्र) डिजिटल सोशल मीडिया समन्वयक म्हणून कट्टर निष्ठावंत शिवसैनिक जयवंत प्रभाकर चौधरी (राजपूत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुक्ताईनगर तालुका संघटक म्हणून अक्षय अरुण पालवे, तर रावेर तालुका महिला आघाडी प्रमुख म्हणून भारती स्वप्निल महाजन यांची निवड करण्यात आली.
नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे आणि जनहिताशी निगडित उपक्रम सोशल मीडिया माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राहणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या, प्रशासनाशी संबंधित प्रश्न तसेच कायदा-सुव्यवस्थेशी निगडित बाबींवर लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आवाज उठविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अफवा नव्हे, तथ्याधारित जनसंवादावर भर
सोशल मीडिया हे जनतेशी थेट संवादाचे प्रभावी माध्यम बनले असले तरी त्याचा वापर करताना कायदेशीर चौकट आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे, अफवा किंवा अपप्रचार टाळणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जबाबदार भूमिका घेणे, ही नव्या डिजिटल पदाधिकाऱ्यांसमोरील महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.
जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडताना संविधानिक मूल्ये, लोकशाही मार्ग आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात रावेर लोकसभा क्षेत्रात पक्षाच्या संघटनात्मक कार्यासोबतच डिजिटल जनसंवादालाही अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे समस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






