देऊळगाव राजा तालुक्यात विकासकामांना गती; आमदार मनोज कायदे यांच्या प्रयत्नांतून कामे मार्गी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील मूलभूत सुविधांच्या विकासकामांना आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांच्या सन २०२५-२६च्या ई-निविदा सूचनेत तालुक्यातील उंबरखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक पुरविणे व बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे.
या कामाची अंदाजित किंमत ८.३० लाख रुपये असून, संबंधित कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोंदणीकृत कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविण्यात आली आहे. आमदार मनोज कायदे यांनी मतदारसंघातील विविध मूलभूत सुविधांच्या कामांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही कामे पुढे येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उंबरखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांना परिसराचा वापर अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कामाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. कामाचा दर्जा, अंदाजपत्रकानुसार अंमलबजावणी आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होते की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यासह मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, शाळा व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित कामांना चालना मिळावी, यासाठी आमदार मनोज कायदे यांच्या स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.



