तलावातील अवैध पाणीउपसा रोखा; ग्रामपंचायतींना सूचना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा : (दि. १ ऑक्टोबर २०२६) यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान वार्षिक सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, ग्रामपंचायत क्षेत्रातील तलावांमधील पाणीसाठा संरक्षित करण्याच्या सूचना मृद व जलसंधारण विभागाने दिल्या आहेत. सिंचन, पाझर व गाव तलावांमधून विद्युत मोटार किंवा पंपाच्या सहाय्याने होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मृद व जलसंधारण, जिल्हा परिषद उपविभाग देऊळगावराजाचे उपअभियंता विनायक प्रल्हाद गावडे यांनी २५ सप्टेंबर रोजी यासंदर्भात देऊळगावराजा, सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व सचिवांना पत्र पाठविले आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रातील संबंधित तलावांमधून कोणी विद्युत मोटार पंपाद्वारे पाण्याचा अवैध उपसा करत असल्यास त्यास मज्जाव करावा. तसेच गावात दवंडी देऊन पाणी बचतीबाबत जनजागृती करावी आणि पाणीउपसा करण्यापासून नागरिकांना परावृत्त करावे, अशा सूचना पत्रातून करण्यात आल्या आहेत.
पाणीटंचाईच्या परिस्थितीत भविष्यात नागरिक तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणीसाठे संरक्षित करण्याची आवश्यकता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
अवैध पाणीउपसा आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाई करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
या पत्राच्या प्रती संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, महावितरणचे संबंधित अधिकारी तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी यांना माहिती व उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.



