Uncategorized
गोर बंजारा साहित्य अकादमीची राजकीयदृष्ट्या पुरस्कृत अशासकीय समिती बरखास्त करा.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : - गोर बंजारा अकादमीच्या अशासकीय समितीवर बहुतांश सदस्याची निवड करतांना शासनाची दिशाभूल करीत केवळ राजकीयदृष्ट्या पुरस्कृत शिफारशीने निवड करण्यात आल्याचे मत गोर बंजारा साहित्य संघाचे संघटक बंजारा साहित्याचे अभ्यासक मनोहर चव्हाण यांनी व्यक्त केले असून ही अशासकीय समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे साहित्यिक -भाषिक आदान - प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु अकादमीच्या अशासकीय समितीवर बहुतांश सदस्याची निवड करतांना शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे मत गोर बंजारा साहित्य संघाचे संघटक बंजारा साहित्याचे अभ्यासक मनोहर चव्हाण यांनी व्यक्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , अशासकीय समितीवरील सदस्यांची निवड करीत असताना बंजारा साहित्य संस्कृती बाबत सदर सदस्यांचे प्रकाशित ग्रंथाची संख्या व दर्जा , संशोधन वा योगदान तपासून निष्पक्षपाती निवड होणे अपेक्षित होते. ह समितीवर निवड करण्यात आलेल्या सदस्यापेक्षाही बंजारा साहित्य संस्कृती क्षेत्रात नामवंत साहित्यिक लेखक , कवी , अभ्यासक असतांना देखील डावलण्यात आल्याने सदर अशासकीय समितीच्या निवडीबाबत प्रचंड नाराजी व विरोध होत आहे. यातील बहुतांश सदस्याचे बंजारा साहित्य संस्कृतीवर आधारित प्रकाशित दर्जेदार ग्रंथ देखील नाही. महत्वाची बाब म्हणजे गोर बंजारा साहित्य अकादमीची ज्यांनी पहिल्यांदा संकल्पना मांडली. सातत्याने पाठपुरावा करुन अकादमी साकारण्यात मोलाचे योगदान देणारे प्रतिभावंत साहित्यिक तथा बंजारा भाषा साहित्य संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार नागपूर यांना देखील अशासकीय समितीमधून डावलण्यात आल्याने साहित्य वर्तुळात तिव्र नाराजी आहे. केवळ राजकीयदृष्ट्या पुरस्कृत शिफारशीने निवड करुन समाजातील प्रतिभावंताना व साहित्य क्षेत्राला वाहुन घेणाऱ्या साहित्ययात्रींना देखील हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याने सदर अशासकीय समिती बरखास्त करण्याची मागणी गोर बंजारा साहित्य संघाने राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत गोर बंजारा समाजाचे साहित्यीक श्रावण जाधव व भिमराव पवार यांनी यांनी सांगितले आहे.











