आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या; शेत जमीन बळकावल्याचा ठपका! न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
(मोताळा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने चर्चेत असतात. वाघाची शिकार करून दात गळ्यात
अडकवल्याचे विधान केल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. बुलढाणा मोताळा रस्त्यावरील
आ. गायकवाड यांच्या मालकीच्या कथित वादग्रस्त शेत जमिनीवरून ते अडचणीत आले आहेत. अनेक दिवसांपासून संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ होते, अखेर मोताळा न्यायालयाने आदेश दिल्याने बोराखेडी पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह ५ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा मोताळा रस्त्यावरील राजुर शिवारातील आपल्या मालकीच्या शेतजमिनीवर आ. गायकवाड यांनी जबरदस्तीने ताबा घेतल्याची तक्रार नागपूर येथील रिटा उपाध्याय या महिलेने केली होती. यात कथित वादग्रस्त शेत जमिनीवर आ. गायकवाड यांनी आलिशान फार्म हाऊस बांधले आहे. या आधी देखील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. संबंधित महिलेने माध्यमांसमोर येत आ. गायकवाड यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान तक्रारदार महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. अखेर मोताळा न्यायालयाने बोराखेडी पोलिसांना या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून आ. गायकवाड, मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे तसेच ज्ञानेश्वर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



