अंढेरा फाट्यावर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; अवैध रेतीचे टिप्पर पळवले, गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी; – शंकर शिवरकर
देऊळगावराजा/अंढेरा : शासकीय कामात अडथळा आणून चक्क महिला तहसीलदारांच्या पथकाला जीवाने मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना अंढेरा फाट्यावर घडली आहे. देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली शिवसिंह डोंगरजाळ यांच्या पथकावर हा हल्ला करण्यात आला असून, आरोपींनी अवैध रेतीने भरलेले टिप्पर पळवून नेले. याप्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ (वय ४२) या आपल्या पथकासह १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास अंढेरा फाटा परिसरात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करत होत्या. दरम्यान, आरोपी हर्षल मनोहर अंभोरे (रा. एकलारा, ता. चिखली) व त्याच्या अज्ञात साथीदाराने पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या टिप्परमधून अंदाजे ८०,००० रुपये किमतीची ४ ब्रास अवैध रेती वाहतूक करताना मिळून आले.
तहसीलदार व त्यांच्या पथकाने हे टिप्पर पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. एवढेच नव्हे तर पथकाला जीवाने मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या शासकीय गाडीला थेट धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी तहसीलदारांच्या खाजगी ब्रेझा गाडीला आपली गाडी आडवी लावून, अवैध रेतीने भरलेले टिप्पर घटनास्थळावरून पळवून लावण्यास मदत केली.
या गंभीर घटनेनंतर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यावरून अंढेरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५) आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा (अप क्रमांक २७०/२०२६) दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) संतोष खाडे सर आणि सहायक पोलीस निरीक्षक (सपोनी) सविता कुवारे मॅडम यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी सविता कुवारे करत आहेत. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात रेती माफियांच्या वाढत्या मुजोरीची जोरदार चर्चा सुरू आहे.



