माती-पाणी संवर्धनाचा संदेश देत राज्यभर ‘महा वॉकेथॉन 2026’….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- १९ ऑगस्ट २०२६
21ऑगस्टला सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयी 3 कि.मी. चालण्याची स्पर्धा विजेत्यांना रोख पारितोषिके
मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मृद व जलसंधारण सप्ताह व अभियान 2026’ अंतर्गत राज्यभर जनजागृतीसाठी ‘महा वॉकेथॉन 2026’ या 3 कि.मी. चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा मुख्यालयी ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या वॉकाथॉनच्या माध्यमातून मृदसंवर्धन, जलसंधारण, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण तसेच गावागावातील मृद व जलसंधारणाची कामे याबाबत जनसहभाग वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना 3 कि.मी. अंतर चालायचे असून जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये तसेच गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय विशेष पुरस्कार म्हणून ईश्वर चिठ्ठीद्वारे सात सहभागींची निवड करून प्रत्येकी 3 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. याच अभियानांतर्गत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यव्यापी Instagram Reel Challenge स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. 15 ते 30 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विषयावर Instagram Reel तयार करून ती आपल्या Instagram अकाउंटवर पोस्ट करायची असून संबंधित विभागाच्या अधिकृत Instagram अकाउंटला टॅग करणे तसेच #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे.
रील स्पर्धेसाठी माती संवर्धन, मातीची धूप रोखणे, पाणी बचत व जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, शेततळे व बंधारे, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण, गावातील मृद व जलसंधारणाची कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचवण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना तसेच आजचे संवर्धन आणि उद्याचे सुरक्षित भविष्य अशा विविध विषयांवर रील तयार करता येणार आहे. स्पर्धकांनी आपली क्रिएटिव्हिटी दाखवत Create – Post – Tag – Hashtag – QR Submit – Certificate या पद्धतीने सहभाग नोंदवायचा आहे. या उपक्रमामुळे युवकांसह नागरिकांमध्ये माती आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे. मृद व जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेता ‘महा वॉकेथॉन 2026’ आणि ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ या दोन्ही उपक्रमांना नागरिकांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे…..✍️



