पत्रकारबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

निर्भीड लेखणीचा राज्यस्तरीय गौरव; पत्रकार छोटू कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी : अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली : सामाजिक बांधिलकी, निर्भीडपणा आणि लोकहिताची भूमिका आपल्या लेखणीतून सातत्याने अधोरेखित करणारे ‘दैनिक आम्ही चिखलीकर’चे मुख्य संपादक तथा युवा पत्रकार छोटू सुधाकर कांबळे यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’साठी निवड झाली आहे. सामान्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देत पत्रकारितेची लोकाभिमुख भूमिका प्रभावीपणे बजावल्याची दखल त्यांच्या या निवडीमागे असल्याचे सांगण्यात आले आहे.

साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंडारे यांच्या तिसऱ्या स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल छोटू कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

छोटू कांबळे यांच्या पुरस्कारासाठीचा प्रस्ताव निवड समितीसमोर सादर करण्यात आला होता. समितीने त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा सखोल आढावा घेतल्यानंतर त्यांच्या नावाची पुरस्कारासाठी निवड केली. निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता या त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे निवड प्रक्रियेत अधोरेखित करण्यात आले.

सामान्यांच्या प्रश्नांना लेखणीचा आधार

पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम कांबळे यांनी केले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविणे, प्रशासनाच्या कामकाजावर लोकहिताच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करणे आणि सामाजिक समस्यांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देणे, या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी जपली आहे.

‘दैनिक आम्ही चिखलीकर’च्या माध्यमातून चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, प्रशासकीय आणि जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्यात आली आहे. ग्रामीण भागातील समस्या तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्याचे काम त्यांच्या पत्रकारितेतून सातत्याने झाले आहे.

चिखलीच्या पत्रकारितेला राज्यस्तरीय ओळख

लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने घेतलेली भूमिका आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना आवाज देण्याच्या कार्याची दखल घेत छोटू कांबळे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चिखलीच्या पत्रकारिता क्षेत्राला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, युवा पत्रकारांसाठीही हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे.

कांबळे यांच्या निवडीची माहिती समोर आल्यानंतर पत्रकारिता, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुरस्काराचे मुख्य आयोजक सचिन खंडारे, निवड समितीचे अध्यक्ष विकास सुखधाने आणि उपाध्यक्ष समाधान सरकटे यांच्यासह निवड समितीने छोटू कांबळे यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

निर्भीड लेखणी, लोकहिताची भूमिका आणि सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणून छोटू कांबळे यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button