उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड; मर्जीतल्यांना लवकर उपचार

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव – येथील सइबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या बहुतांश रुग्णांची हेळसांड होत असल्याचे खरेखुरे चित्र आहे.मर्जीमधील तसेच वशिलेबहाद्दरवाल्यांनाच येथे सगळे उपचार लवकर मिळतात. शिवाय येथील डॉक्टर आदी सर्वांचीच अरेरावी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहन करावी लागते.खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्याची कुवत नाही आणि दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयात मोफत उपचार करून घेताना ही अडचण. शिवाय अरेरावी. एकूणच तोंड दाबून बुक्यांचा मार असाच प्रकार सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्याबाबतीत असल्याचे रुग्णालयात दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या येथे जास्त आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला स्ट्रेचरवरून वार्डमध्ये दाखल करावे लागते. बाहेर गावातून आलेले रुग्ण दाखल केल्यानंतर नातेवाइकांची गैरसोय होते. पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता नाही. उपचारादरम्यान डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे बाहेरून विकत आणावी लागतात.रुग्णालयात सर्वच प्रकारच्या आजाराचे रुग्ण येतात. मात्र कर्मचारी आणि सोयी सुविधांअभावी रुग्ण आणि नातेवाईक यांची फरफट होत आहे. मोठया प्रमाणात गैरसोयीला सामोरे जात आहेत. रुग्णाची संख्या वाढल्याने एक्स रे, केस पेपर व विविध तपासण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होते. त्यातच मर्जीतल्या आणि वशिला असणाऱ्याचा उपचार लवकर मिळत असून गोरगरिबांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रियादेखील अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.रुग्णालय परिसरात पार्किंगची सुविधा असतानाही बाह्यरुग्ण विभाग, तातडीचा कक्ष येथे कर्मचाऱ्यांच्या गाड्या बिनधास्तपणे पार्क केल्या जातात. तातडीच्या वेळेस या गाड्यांमुळे अडचण निर्माण होते.



