बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक निवडणुकीत ८४.३ टक्के मतदान; मलकापूरसह जळगाव जामोद, संग्रामपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!

मलकापूर : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या समिती सदस्यांच्या सन २०२६-२०२७ निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून, जिल्ह्यात एकूण ८४.३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारीनुसार मलकापूर मतदारसंघात ९४.७ टक्के मतदान झाले आहे. तर जळगाव जामोदमध्ये ९९.३ टक्के आणि संग्रामपूरमध्ये ९९.२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मतदारांचा निवडणुकीतील सहभाग लक्षणीय राहिला.
बुलढाणा मतदारसंघात ८९.५ टक्के, चिखलीत ८५.२ टक्के, मोताळ्यात ९५.३ टक्के, नांदुऱ्यात ९४.६ टक्के, शेगावमध्ये ९४.२ टक्के आणि खामगावमध्येही ९४.२ टक्के मतदान झाले.
याशिवाय मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या मतदारसंघांमध्येही मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या समिती सदस्यांच्या निवडणुकीत विविध मतदारसंघांतील मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने आता मतमोजणी आणि निकालाकडे उमेदवारांसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे मलकापूरमध्ये ९४.७ टक्के मतदान झाल्याने येथील निकालाबाबत राजकीय व सहकार क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.




