श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम येथे दिव्यांग वधूवर परिचय मेळावा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर १४ मार्च २०२६
आज श्री संत गुलाबबाबा यांची पुण्यभूमी काटेलधाम येथे दिव्यांग बांधवांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी असा भव्य दिव्यांग वधूवर परिचय व मार्गदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू-भगिनींनी उपस्थित राहून आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारा हा उपक्रम अनुभवला.
दिव्यांग बांधवांना समाजात समान संधी मिळाव्यात, त्यांचे संसार आनंदाने फुलावेत आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सौ. अपर्णा संजय कुटे यांनी दिव्यांग बांधवांना आधार, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास देत त्यांना जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमात वधू-वर परिचयाबरोबरच दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, नोकरीच्या संधी, स्वावलंबनाचे मार्ग, कौशल्य विकास, शिक्षण व उद्योजकतेच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनेक दिव्यांग बांधवांनी आपली स्वप्ने, अपेक्षा आणि भविष्याची दिशा या मंचावरून व्यक्त केली.
हा केवळ वधू-वर परिचयाचा कार्यक्रम नव्हता, तर दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नवीन आशा, विश्वास आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवणारा एक सामाजिक उपक्रम ठरला. समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांगांना समजून घेत त्यांना साथ दिली, तर त्यांची क्षमता आणि कर्तृत्व नक्कीच समाजाला नवी दिशा देऊ शकते, हा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
राष्ट्रिय असोसिएशन फॉर ब्लाईंड, बुलढाणा, बुलढाणा अर्बन, श्रीसंत गुलाबबाबा संस्था काटेलधाम, दिव्यांग क्रांती संघटना रायगड व श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आनंद, सन्मान आणि स्वावलंबनाचे नवे क्षितिज निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल….



