मुंडगाव येथील उपोषणाला प्रशांत डिक्कर यांचा जाहीर पाठिंबा, उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी धाव….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
मुंडगाव दि. ११ मार्च २०२६
प्रलंबित विकासकामांसाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत हक्कांच्या पूर्ततेसाठी ‘संत नगरी मुंडगाव व एकता ऑटो रिक्षा युनियन’ तर्फे आजपासून बस स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (शेतकरी आघाडी) प्रशांत डिक्कर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व प्रशासनाच्या धोरणांचा निषेध केला.
मुंडगावमधील अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, वणी वारुळा ते वरवट रोडचे काम अंदाजपत्रकानुसार करणे आणि अतिक्रमण निर्मूलन यांसारख्या ७ प्रमुख मागण्यांसाठी श्रीकृष्णभाऊ वाघ, प्रभाकरभाऊ भालेराव, संतोषभाऊ सदार आणि योगेशभाऊ गावंडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
यावेळी बोलताना प्रशांत डिक्कर म्हणाले की, “प्रशासनाने जनहिताच्या मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळेच आज कार्यकर्त्यांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. जोपर्यंत प्रशासन या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करत नाही आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही, तोपर्यंत स्वराज्य पक्ष या लढ्यात खंबीरपणे पाठीशी उभा राहील. गरज पडल्यास या प्रश्नावर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शिवराम डिक्कर, राहुल बाहाकर,रोशन देशमुख यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
या पाठिंब्यामुळे उपोषणकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे….



