महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेबांची पदस्पर्श प्रेरणाभूमी पातुर्डा!(भिमराव परघरमोल)

     २९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत होऊन प्रेरणास्थान बनलेली भूमी म्हणजे पातुर्डा जिल्हा बुलढाणा.
          विसाव्या शतकाचे तिसरे दशक म्हणजे १९२० ते ३० चा काळ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समाज परिवर्तनाची झंजावाती ज्वाला संपूर्ण भारतव्याप्त करत होती. त्यामुळे अस्पृश्य (स्पर्श करण्यास अयोग्य) समाजाची स्वाभिमान शून्यता जागृत होऊ पाहत होती. पशुपक्षांसाठी निसर्गाने समृद्ध केलेल्या सोयीसुविधा पुरेशा असतात. परंतु माणसाचे मात्र तसे नाही. तो तेवढ्यावर समाधान मानत नाही. त्यापलीकडे जाऊन जे नाही ते मिळवून समृद्ध जीवन जगण्यासाठी तो रात्रंदिवस धडपडत असतो. त्यासाठी वाटेल ती किंमत, पडतील ते कष्ट करण्याची त्याची तयारी असते. परंतु भारतातील मनुवादी समाज व्यवस्थेने जातीयता, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, गुलामी,  माणसांमध्ये भेदभाव निर्माण केला. ती कोणाच्या सडक्या मेंदूची उपज आहे हे नव्याने सांगण्याची गरज नव्हे. त्या विषमतावादी समाज व्यवस्थेतील अस्पृश्य समाजाला नैसर्गिक सोयी सुविधांपासून वंचित ठेवून पशुपक्षांसमानही हक्क-अधिकार नसावे हे अखिल वसुंधरेमाजी फक्त भारतातच दिसून येत होतं हेही आश्चर्यच!
        ऐतिहासिक घडामोडींमुळे पदरी लादलेलं जुलमी जीनं,  हे आपलं प्रारब्ध किंवा पूर्वजन्मिचं पाप असाही समज पिढ्यानपिढ्या रूढ झालेला होता. या जन्मीतरी यामधून सुटका नाही अशी मनोमन खात्री झालेली असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाजाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन सर्वात प्रथम त्यांच्यात स्वाभिमान चेतवायला सुरुवात केली. आम्हीही आपल्या सारखीच हाड-मांसाची माणसं आहोत. जशी आपल्या शरीरप्रकृतीची ठेवण, रक्ताचा रंग तसाच आमचाही. मग हा भेदभाव, ही अस्पृश्यता, ही जातीयता, ही वर्णव्यवस्था, ही गुलामी कशासाठी? आमच्यासाठी काही करणे  नसेल शक्य. परंतु प्रकृतीने बहाल केलेले हक्क-अधिकार सोयी-सुविधा उपभोगण्यासाठी मनाई का? निसर्गनिर्मित पाणी मिळू द्यायचे नाही, (काय तर म्हणे जमिनीच्या आत असणाऱ्या सर्व साधन-संपदेवर ब्राह्मणांचा अधिकार असतो) आणि वरून अस्वच्छ राहतात म्हणून विटाळ!  धनसंपत्ती गोळा करू नये, चपातीचे जेवण करू नये, नवीन वस्त्र परिधान करू नये, तांब्या- पितळेची भांडी वापरू नये, ताजं अन्न सेवन करू नये ही धर्मग्रंथांची मनाई. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी शिळं-पाकं, उष्ट-खरकटं, मृतमांस खातात म्हणून अस्पृश्यता! हा कुठला न्याय? ही तर शिरजोरी!
        भारतीय समाजमनाच्या चाचपणी अंति डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले की, निगरगट्ट गेंड्याच्या कातडीची बिभत्स मानसिकता बदलायला तयार नाही. म्हणून आपल्या एका भाषणामध्ये ते म्हणतात की,    
 "स्वाभिमान जागृतीची व संरक्षणाची चळवळ जोरात सुरू केली पाहिजे. अस्पृश्योधाराच्या गप्पा आता खूप झाल्या. अस्पृश्य जातीत जन्मलो म्हणून अंगी कितीही गुण असले तरी काहीही करता येत नाही. नुसत्या शिक्षणाने माणुसकी मिळाली असती तर सुशिक्षित वरिष्ठ वर्गाकडून आमच्यावर अन्याय अत्याचार झाले नसते. देवालय, तळी, विहिरी इत्यादी ठिकाणी प्रवेश नाकारून आमच्यावर अन्याय अत्याचार केला जातो. हिंदू समाजाने निष्कारण आमच्यावर अस्पृश्यता लादली. तो कलंक धुवून काढण्यासाठी स्वाभिमान जागृतीची चळवळ जोराने राबवून अन्यायी जुलुमविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाही. त्यासाठी वाटेल त्या सन्मार्गाचा उपयोग करावा."
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या हाकेला ओ देण्यासाठी ठिकठिकाणी अस्पृश्य पुढार्‍यांच्या निर्माण झालेल्या फौजा आप आपल्या इलाख्यात स्वाभिमान जागृती व संरक्षणासाठी परिषदा तथा प्रबोधन सभा घडवून आणू लागले. तेव्हा त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा (त्यावेळचे  वऱ्हाड व मध्यप्रांत) येथील पाच हजार अस्पृश्य महारांनी हिंदूमहासभा व  आर्य समाजीष्ठाना धर्मांतराची नोटीस दिली होती. जर स्पृश्य (सवर्ण) समाज आमच्या सोबत समानतेने वागला नाही तर आम्ही मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करू. त्याला कारणही तसेच होते त्यावेळी  ब्राह्मणेतर संघटना व इतर काही हिंदू संघटना दरवर्षी आपापल्या अधिवेशनांमध्ये अस्पृश्यता निवारणार्थ ठराव संमत करत होते. परंतु त्यांची कृती मात्र शून्य होती. अस्पृश्य पुढार्‍यांनी त्यांना कृती संदर्भात विचारले असता प्रथम आपल्यातील म्हणजे अस्पृश्य जातीतीलच भेदभाव, शिवाशिव दूर करा म्हणजे आम्हाला काहीतरी करता येईल. असे त्यांचे प्रतीप्रश्न येत होते. त्याला उत्तर म्हणून अस्पृश्य पुढार्‍यांनी जळगाव, माळेगाव बाजार, पंचगव्हाण, मनात्री इत्यादी ठिकाणी मांग, महार, चांभार, ढोर, भंगी यांच्या सहभोजनाच्या पंगती उठवल्या. अशा परिवर्तनवादी महार पुढाऱ्यांवर बहिष्कार घालावा म्हणून इतर गावातील जातभाईंना भडकवण्याची, आपापसात दुही निर्माण करण्याचे कार्य काही उच्चवर्णीयांनी सुरू केले. 'असे वागणे बरे नाही, तुमच्या वाडवडिलांनी असा धर्म कधीच बुडवला नाही'. असे चिथावून  जळगाव तालुक्यातील खेरडा येथे एक सभा ही भरवली गेली.परंतु वेळीच त्यामागील कटकारस्थान कोणाचे हे शोधून तेथील लोकांची समजूत घालून तो डाव उधळला गेला.
      धर्मांतरासंबंधी आपल्या अस्पृश्य ज्ञाती बांधवांची मते जाणून घेण्यासाठी दि. २९ मे १९२९ रोजी जळगाव तालुक्यातील पुढाऱ्यांनी वऱ्हाड मध्यप्रांतीय अस्पृश्य परिषद बोलावली. पातुर्डा येथे भरलेल्या या दोन दिवसीय परिषदेला प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते. बाहेरगावावरून आलेले काही पुढारी रा.पी. मटकर, सोनवणे, मकेसर, केशवराव खंडारे, संभाजी जाधव, रायभान इंगळे, शंभूजी खंडारे इत्यादींसह काही ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी शा.स. आनंदस्वामी, उखंडराव टाले वगैरे मंडळीचीही उपस्थिती होती. परिषदेला सायंकाळी सात वाजता सुरुवात होऊन प्रथमारंभी बक्षुरामजी दाभाडे यांची कन्या कौतिकाबाई व सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात पार पडला.
       त्यानंतर परिषदेच्या कार्यास सुरुवात होऊन  स्वागताध्यक्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्वत्ताप्रचूर व मुद्देसूद भाषण झाले. त्यामध्ये ते म्हणतात की, "बुलढाणा जिल्ह्यातील अस्पृश्य व ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी अस्पृश्यता निवारणार्थ आटोकाट प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळू शकले नाही. उलट भिक्षुकशाहीने त्यांना विरोध केला. त्यांच्या विरोधात खोट्यानाट्या बदनामीकारक बातम्या छापणे. सरकारी ब्राह्मण अधिकाऱ्यांना चिथावणे. त्यांच्यावर बहिष्कार घालणे. जणूकाही ती चळवळ नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी  विळाच उचलला होता. या अनन्वित  छळाला कंटाळून हजारो लोकांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. परंतु तरीही भिक्षुकशाही, शुद्धीवाले तथा हिंदूमहासभावाल्यांना थोडाही गंध नाही. त्यांनी त्यांच्या दुःखाची थोडीही परवा केली नाही."
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर धर्मांतराच्या ठरावावर उहापोह झाला. सर्व बहिष्कृत वर्ग अनुकूल दिसला. ब्राह्मणेतर पुढार्‍यांची सकारात्मक भाषणे होऊन ठराव एकमताने पास झाला.
       दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिमहत्त्वाचे काम म्हणून ते मुंबईला रवाना झाले. त्या दिवशीचे कामकाज आनंदस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. सर्व खर्च बक्षुरामजी दाभाडे यांनी स्वमर्जीने केला.
        जळगावच्या अस्पृश्य महारांनी धर्मांतरासंबंधी उच्चवर्णियांना दिलेला कालावधी संपला, म्हणून काय निर्णय घ्यावा? या द्विधा मनस्थितीत असतांना त्यांना परिषदेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आठवले. धर्मांतराशिवाय अस्पृश्यता संपण्याचा मार्ग कठीण आहेत. त्या मार्गाने जाण्याचा सोशिकपणा ज्यांच्या अंगी नसेल त्यांनी धर्मांतर करण्याच्या विरुद्ध आपण नाही. अस्पृश्यतेचा प्रश्न ज्यांना जसा सोडवता येईल तसा त्यांनी सोडवावा. म्हणून जळगावतील बारा लोकांनी प्रथम मुस्लिम धर्मात प्रवेश केला. तेव्हा मात्र सोहळ्यांचे डोळे खाडकन उघडले. जे महारांना म्हणायचे, 'खुशाल धर्मांतर करा, मुस्लिम व्हा नाहीतर ख्रिस्ती. तुमच्या वाचून आमचं काहीही अडणार नाही.' परंतु बारा लोकांच्या धर्मांतराने खळबळ उडाली. डोळ्यासमोर दिवसा तारे चमकू लागले. अस्पृश्य आपल्या डोळ्यासमोर स्वतःचे हक्क अधिकार प्राप्त करून घेतात की काय? मुस्लिमांची संख्या वाढेली तर मंदिरात येऊ दिले नाही तरी मंदिर रक्षणासाठी धावनारे हातच कदाचित ते उध्वस्त करण्यास मदत करतील. म्हणून धर्मांतराचा प्रवास थांबवला पाहिजे. त्यासाठी  सोवळ्या स्पृश्य लोकांनी दोन विहिरी खुल्या करून तिघांच्या घरी अस्पृश्य पुढाऱ्यांना पानसुपारीसाठी बोलावले. तिथे कोणते स्पर्शास्पर्शाचे बंधन पाळले नाही.
       जळगाव तालुक्यातील पुढाऱ्यांनी महत्प्रयासाने विजयश्री खेचून आणली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. परंतु त्याची  पाळमुळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व पातुर्डा येथील अस्पृश्य परिषदेमध्ये होती. त्यामुळे ती भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पदस्पर्श प्रेरणाभूमी म्हणून नावारूपाला आली. दरवर्षी २९ मे ला त्याठिकाणी हजारो लोक भेटी देतात. काही पर्यटन म्हणून, तर काही नतमस्तक होण्यासाठी. परंतु त्या ठिकाणाहून कोणती प्रेरणा घेऊन जावी? हाही प्रश्न येणाऱ्या प्रत्येकाला पडला पाहिजे. पैसा किंवा ऐपत असतानाही कमी खर्चात व सुधारणावादी पद्धतीने लग्न करून वाचलेला पैसा समाजासाठी खर्च करावा. परिवर्तनाची अपेक्षा ठेवणारांनी मनुवाद्यांसोबत लढताना जीवाची बाजी लावणे. पोकळ धमक्यांनी परिवर्तन शक्य नाही. लढताना सर्व आयुधानीशी रणांगणावर उतरणे भाग आहे. ज्या संविधानाने अस्पृश्यता संपुष्टात आणली त्याचा सन्मान, सुरक्षा, तथा संवर्धन करण्यासाठी समर्पण करणे सर्व बहुजनांचे (पूर्वीचे अस्पृश्य व  ब्राह्मणेतर) कर्तव्य आहे. ही प्रेरणा उराशी घेऊन गेलो तरच येणाऱ्या पिढ्यांची हक्क-अधिकार सुरक्षित राहतील. अन्यथा पूर्वीची परिस्थिती (मनुस्मृति प्रणित) पायघड्या घालून तयारच आहे.......

            भिमराव परघरमोल
        व्याख्याता तथाअभ्यासक
      फुले शाहू आंबेडकरी विचारधारा 
           तेल्हारा जि. अकोला      
             मो. ९६०४०५६१०४

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button