खानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशेती

जळगाव केळी पीक विम्यात ६६ कोटींचा ‘बोगस’ डल्ला; मुक्ताईनगरमधील ५ सीएससी केंद्रचालकांवर गुन्हे दाखल

मुक्ताईनगर (विशेष प्रतिनिधी):
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली शासनाची आणि विमा कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात उघडकीस आला आहे. बनावट माहितीच्या आधारे सुमारे ६६ कोटी ५० लाख ५७ हजार ४० रुपयांचा अपहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५ सीएससी (CSC) केंद्रचालकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण काय?
‘पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६’ (आंबिया बहार) अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यात केळी पिकासाठी मोठ्या प्रमाणावर विमा अर्ज भरण्यात आले होते. विमा कंपनी आणि कृषी विभागाने केलेल्या तांत्रिक पडताळणीत असे आढळले की, अनेक क्षेत्रांवर प्रत्यक्षात केळीची लागवड नसतानाही केवळ विम्याचे पैसे लाटण्यासाठी बोगस नोंदणी करण्यात आली.
महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर यांच्या उपग्रह छायाचित्रांच्या (Satellite Images) अहवालानुसार, तालुक्यात तब्बल १२,६२९.८३ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक पेरा दाखवून विमा उतरवण्यात आला होता.
अशी झाली फसवणूक
तपास अहवालानुसार, ५२६५ विमा अर्जदारांच्या क्षेत्रावर प्रत्यक्षात ४० टक्क्यांपेक्षा कमी केळी पीक असल्याचे किंवा लागवडच नसल्याचे दिसून आले. सीएससी केंद्रचालकांनी संगनमताने:

  • बनावट ७/१२ उतारे आणि कागदपत्रांचा वापर केला.
  • क्षेत्रावर केळी नसतानाही खोटी माहिती पोर्टलवर अपलोड केली.
  • शासकीय अनुदानाचा (राज्य व केंद्र हिस्सा) गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.
    गुन्हा दाखल झालेले केंद्रचालक:
    तालुका कृषी अधिकारी प्रथमेश पंढरीनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील केंद्रचालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) नुसार गुन्हे दाखल झाले आहेत:
    १. निलेश शांताराम पाटील मु पो उचदा ता मुक्ताईनगर – १० लाख ६८ हजार १५७ रुपये
    २. अनिरुद्ध तुकाराम अहिरे मु पो ता मुक्ताईनगर – ८८ लाख ६५ हजार १२६ रुपये फसवणूक.
    ३. चिरायू भुवनेश्वर चौधरी मु पो ता मुक्ताईनगर – १ कोटी १३ लाख ९१ हजार ७५२ रुपये फसवणूक.
    ४. विजय रामदास पाटील -मु पो अंतुर्ली ता मुक्ताईनगर एक कोटी 16 लाख 38 हजार 252 रुपये फसवणूक
    ५. दिगंबर सुखदेव चौधरी मु पो कर्की ता मुक्ताईनगर – एक कोटी 77 लाख 94 हजार 836 रुपये

    जिल्ह्यात खळबळ; ४८ केंद्रांची चौकशी
    विमा कंपनीच्या अहवालानुसार, जळगाव जिल्ह्यातील एकूण ४८ सीएससी केंद्रांवरून अशा प्रकारे शंभरपेक्षा जास्त बोगस अर्ज सादर करण्यात आले होते. त्यापैकी मुक्ताईनगर तालुक्यातील ५ केंद्रांवर ही पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात बोगस विमा उतरवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रशासकीय इशारा: “विमा पोर्टलवर माहिती भरताना चूक किंवा गैरव्यवहार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सीएससी केंद्रचालकाची राहील, असे शासन निर्णयात स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा हडपणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही,” असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील तपास: मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button