दीपनगर प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा; प्रलंबित सीएसआर (CSR) निधीचा मुद्दा ऐरणीवर

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या विस्तारामुळे वाढलेला खर्च आणि त्या अनुषंगाने स्थानिक परिसराच्या विकासासाठी मिळणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) या विषयावर आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला. खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे दीपनगर प्रकल्पातील निधी वाटपाची वस्तुस्थिती समोर आली आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला की, दीपनगर येथील औष्णिक वीज प्रकल्पाची किंमत तब्बल १८०० कोटी रुपयांनी वाढली आहे. प्रकल्पाची किंमत वाढल्यामुळे नियमानुसार स्थानिक विकासासाठी दिला जाणारा सीएसआर निधी देखील वाढवून मिळणे आवश्यक आहे. हा वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन काय विचार करत आहे? तसेच, जर या कामात विलंब होत असेल, तर त्याची नेमकी कारणे काय आहेत, असा सडेतोड सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याची बाब मान्य केली. कोव्हिड महामारीमुळे कामाला विलंब झाला आणि पर्यायाने प्रकल्पाची किंमत वाढली, असे सरकारने स्पष्ट केले. मात्र, प्रकल्पाची किंमत वाढली असली तरी सीएसआर निधी त्या प्रमाणात वाढवण्याचा प्रस्ताव सध्यातरी विचाराधीन नसल्याचे सरकारने नमूद केले.
सीएसआर निधीबाबतची आकडेवारी जाहीर करताना त्यांनी सांगितले
प्रकल्पाच्या ५ किमी परिघात विकासकामे करण्यासाठी १८.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.यापैकी केवळ ३.५९ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत.
सुमारे १४.४३ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील
प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ३.६४ कोटी रुपये सीएसआर अंतर्गत खर्च करण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आमदार एकनाथराव खडसे यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून दीपनगर परिसरातील गावांच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा पटलावर आणला आहे. प्रकल्पाची किंमत १८०० कोटींनी वाढते, मग स्थानिकांच्या हक्काचा विकास निधी का रखडतो? हा त्यांचा मूळ रोख होता. सरकारच्या उत्तरानंतर आता प्रलंबित असलेली १४ कोटींची कामे आणि नवीन निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.
आमदार खडसे यांच्या या प्रश्नामुळे दीपनगर प्रकल्पाच्या नावाखाली निधी अडकून पडलेल्या कामांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.



