MBA, MCA सह व्यावसायिक अभ्यासक्रमांना OBC विद्यार्थ्यांसाठी 100% शिष्यवृत्ती द्या: ओबीसी जनकल्याण संघाची मागणी

MBA, MCA सह व्यावसायिक अभ्यासक्रमांना OBC विद्यार्थ्यांसाठी 100% शिष्यवृत्ती द्या: ओबीसी जनकल्याण संघाची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता प्रतिनिधी
विनोद तायडे
जळगाव: अन्य प्रवर्गाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना MBA, MCA, B.Voc, M.Voc व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पदवी, मास्टर पदवी अभ्यासक्रमांसाठी 100% शिष्यवृत्ती, लॅपटॉप-टॅबलेट योजना, इंटर्नशिप व वसतिगृह योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्रतर्फे करण्यात आली.
याबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे यांच्यासह सर्व संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना देण्यात आले.
संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 100% शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक योजना लागू आहेत. मात्र OBC विद्यार्थ्यांना MBA, MCA, B.Voc, M.Voc व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारख्या महत्त्वाच्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे हजारो गरीब, होतकरू OBC विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
तसेच दूरस्थ, बहिःस्थ व ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नाही.
संघाच्या प्रमुख मागण्या:
- अन्य प्रवर्गाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना MBA, MCA, B.Voc, M.Voc व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभ्यासक्रमांसाठी या वर्षापासून 100% शिष्यवृत्ती व संपूर्ण फी माफी द्यावी.
- या अभ्यासक्रमांच्या OBC विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप-टॅबलेट योजना सुरू करावी.
- शासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये मानधनासह इंटर्नशिप योजना अनिवार्य करावी.
- प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर OBC विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे.
- दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांनाही शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती लागू करावी.
“OBC समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये व त्यांना समान शैक्षणिक व रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून 10 जून 2026 पर्यंत लेखी GR काढावा,” अशी मागणी प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर, प्रदेश महासचिव प्रा. शिवाजी विसपुते, चंद्रकांत पासेकर, जिल्हाध्यक्ष संजय चौधरी, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश ठाकरे महाराज, बापूसाहेब महाजन, कृष्णा बागुल, अशोक पाटील, रामकृष्ण चौधरी, वसंत महाजन, सुभाष अकोले, डी.डी. वाणी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



