रोजगार महाकुंभातून जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा बुलढाणा, दि.8 : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच विविध आस्थापनांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित या मेळाव्यांमध्ये विविध उद्योग, कंपन्या व आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आस्थापनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधता येणार आहे.
जिल्ह्यातील मॉडेल डिग्री महाविद्यालय, बुलढाणा, श्री. शिवाजी महाविद्यालय चिखली, शासकीय तंत्रनिकेतन खामगांव, जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर, एम.ई.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर, भगवानबाबा कला व वाणिज्य महाविद्यालय लोणार, श्री. वेंकटेश कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय देऊळगाव राजा, के.बी.जे. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा, सरस्वती कॉलेज शेगाव, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस खामगाव व राजमाता पॅरामेडिकल कॉलेज सिंदखेड राजा येथे रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या व इतर आस्थापनांनी त्यांच्या उपलब्ध रिक्त पदांची माहिती विहित नमुन्यात सादर करावी. संबंधित रिक्त पदांची माहिती buldanarojgar@gmail.com या ई-मेलवर १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पाठविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त गणेश प्र. बिटोडे यांनी केले आहे



