मुक्ताईनगर तालुक्यात सुरु होत आहे पहिले रुग्णांना रक्त पुरवठा करणारे केंद्र

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) –
आरोग्य सेवेतील ऐतिहासिक पाऊल टाकत तालुक्याच्या आरोग्य सेवेत नवा अध्याय सुरू होत असून, मुक्ताईनगर तालुक्यातील पहिले रक्त साठा केंद्र – पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर – येत्या २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्य उद्घाटन सोहळ्यातून सुरू होणार आहे.
रक्ताच्या कमतरतेमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात येत असतात. ही गरज ओळखून, पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे अत्यावश्यक अशी ही सुविधा मुक्ताईनगरकरांसाठी सुरू करण्यात येत आहे. या ब्लड स्टोरेज सेंटरची स्थापना संजीवनी ब्लड बँक, फैजपूर यांच्या सौजन्याने करण्यात आली आहे.
ही सुविधा डॉ. प्रवीण ए. पाचपांडे (संचालक पाचपांडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मुक्ताईनगर व श्री. सोपान एच. पाटील (संचालक मुक्ताई क्लीनिकल लॅबोरेटरी, मुक्ताईनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेसाठी कार्यान्वित होणार आहे.
कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून,
“सर्व नागरिकांनी या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,” व रक्तदान शिबीरात रक्तदान करून मोलाचे कार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



