ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे डॉक्टरांकडून रुग्णांसोबत गैरव्यवहाराचा आरोप

मोताळा, दि. २९नोव्हेंबर २०२४
समाजवादी पार्टीचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख सैय्यद युसुफ सैय्यद मुसा यांनी ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गैरव्यवहार आणि अरेरावीची वागणूक दिल्याचा आरोप करत तक्रार अर्ज सादर केला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, कोथळी येथील परवीन बी गुलाब शाह यांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय गाठले असता, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर धीरज म्हस्के यांनी २ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास उपचार न करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी योग्य उपचार न करता अरेरावीने वागतात. आपत्कालीन रुग्णांवर उपचारात दिरंगाई केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
सैय्यद युसुफ यांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी ही तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी आणि आरोग्य उपसंचालकांकडे सादर केली आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वर्तणुकीमुळे रुग्णांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी,,,,! सौ सरला ससाणे
मोताळा/बुलडाणा



