अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनाला टिप्परची धडक

तहसीलदारांसह चार जण थोडक्यात बचावले; ५०० मीटर पाठलाग करून टिप्पर ताब्यात
अंढेरा : अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या वाहनाला रेतीने भरलेल्या टिप्परने धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी अंढेरा फाट्याजवळ घडली. या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह पथकातील चार जण थोडक्यात बचावले. धडकेनंतर टिप्पर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, महसूल पथकाने सुमारे ५०० मीटर पाठलाग करून टिप्पर अडवत चालकाला ताब्यात घेतले.
अंढेरा व चिखली परिसरात अवैध रेती वाहतुकीबाबत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे पथक पहाटेच कारवाईसाठी रवाना झाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास अंढेरा फाट्याजवळ रेतीने भरलेला पांढऱ्या रंगाचा टिप्पर पथकाच्या निदर्शनास आला.
पथकाने टिप्पर थांबवून चालकाची चौकशी सुरू केली. पुढील कारवाईसाठी चालकाला पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची सूचना करण्यात आली. मात्र, चालकाने त्यास विरोध करत वाहन घेऊन निघून जाण्याचा प्रयत्न केला. तक्रारीनुसार, याचदरम्यान टिप्पर मालक हर्षल अंभोरे याने पथकाचे वाहन हटविण्याच्या उद्देशाने टिप्पर पुढे नेण्यास चालकाला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर टिप्पर चालकाने तहसीलदारांच्या पथकाची एमएच-४६-डी-५५ क्रमांकाची इनोव्हा कार लक्ष्य करत तीव्र वेगाने वाहन वळवले. टिप्परची इनोव्हा कारला जोरदार धडक बसली. या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, तलाठी आकाश खरात, पंजाब ताठे तसेच वाहनचालक संतोष भोपळे हे थोडक्यात बचावले.
धडकेनंतर पळ काढला; ५०० मीटरवर टिप्पर पकडला
धडक दिल्यानंतर टिप्पर चालकाने वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. मात्र महसूल पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे ५०० मीटर अंतरावर टिप्पर अडवून चालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत टिप्परसह चार ब्रास रेती आणि लाल रंगाची ब्रिझा कारही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी टिप्पर मालक हर्षल अंभोरे आणि चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाच्या तक्रारीनुसार बीएनएस कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५), ४८(७) व ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तहसीलदारांचा गौरव अन् काही दिवसांतच धक्कादायक प्रकार
विशेष म्हणजे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या महसूल विभागातील कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. या गौरवानंतर अवघ्या काही दिवसांतच अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना त्यांच्या पथकाला अशा धोकादायक प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या पथकांवर अशा प्रकारे वाहन घालण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.



