हनीट्रॅपची मास्टरमाईंड सपना निकळजे गजाआड; युवकांनी सोशल मीडियावरील अनोळखी मैत्रीपासून सावध राहावे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा.
हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या गंभीर प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील सपना संतोष निकळजे (वय 23, रा. पांगरी उगले, ता. सिंदखेड राजा) हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरून तरुणांशी ओळख वाढवून, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, हॉटेल किंवा लॉजवर बोलावून अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणे, असा या टोळीचा कथित कार्यपद्धतीचा प्रकार असल्याचा आरोप आहे.
पोलिस तपासात सपना एकटी नसून तिच्यासोबत आणखी पाच साथीदार असल्याचे समोर आले आहे. या टोळीने अनेकांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही ती कारागृहात जाऊन आली होती. मात्र बाहेर आल्यानंतर पुन्हा ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जालना पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.
युवकांसाठी महत्त्वाचा संदेश
या घटनेच्या पार्श्वभूमीवर युवकांनी सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. गोड बोलणे, प्रेमाचे आमिष, व्हिडिओ कॉल किंवा एकांतात भेटण्याचे निमंत्रण यामागे फसवणुकीचा डाव असू शकतो. क्षणिक आकर्षणामुळे आयुष्यभराची बदनामी, मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद प्रकाराला बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
“अनोळखी मैत्रीपेक्षा स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची; सावध राहा, हनीट्रॅपपासून दूर राहा.”



