रावेर–पुनखेडा–पातोडी मार्गाचे काम अपूर्णच; पहिल्याच पावसात रस्ता उखडल्याने नागरिक संतप्त

डांबरीकरण पूर्ण झाल्याचा दावा फोल? दुर्गादेवी मंदिरासमोरील रस्ता अपूर्ण, निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : विकास आमोदकर
रावेर : रावेर–पुनखेडा–पातोडी मार्गावरील डांबरीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात दुर्गादेवी मंदिरासमोरील वळणापासून पुढील काही भाग अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, ज्या भागात डांबरीकरण करण्यात आले आहे, त्या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडून खडी बाहेर आली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचीही नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना दुर्गादेवी मंदिरासमोरील महत्त्वाचा भाग अपूर्ण का ठेवण्यात आला, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामेही अद्याप रखडल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अपूर्ण डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, पहिल्याच पावसात उखडलेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी तसेच गावातील रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय, झालेल्या कामाच्या दर्जाची सखोल चौकशी करून निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.



