बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जिल्हा रुग्णालयातील खरेदी गैरव्यवहार; ४ वर्षांपासून कारवाई प्रलंबित, शासन मंजुरीसाठी सामाजिक कार्यकर्त्याचे आझाद मैदानावर उपोषण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता, कथित भ्रष्टाचार आणि शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी गेल्या चार वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. विविध शासकीय विभागांकडून यावर चौकशी आणि पत्रव्यवहार झाला असला, तरीही अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी खरात यांनी १४ ऑगस्टपासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

लाचलुचपत विभागाकडून मंजुरीची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, या कथित खरेदी गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आपली प्राथमिक चौकशी केली आहे. यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम १७-अ अंतर्गत पुढील सखोल तपास आणि आवश्यक फौजदारी कार्यवाही करण्यासाठी विभागाकडून शासनाची रीतसर मंजुरी मागण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर ही मंजुरी रखडल्याने पुढील कायदेशीर कारवाई थांबली आहे.

चौकशीचे आदेश, पण अंमलबजावणी शून्य

या गैरव्यवहाराबाबत आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई आणि नागपूर कार्यालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अमरावती मंडळाच्या उपसंचालकांनीही या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला होता. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कागदोपत्री पुरावे आणि चौकशी होऊनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आझाद मैदानावरून थेट सरकारला आव्हान

आरोग्य विभागातील या कथित भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी चंद्रकांत खरात यांनी मुंबई गाठली आहे. “जोपर्यंत शासन या प्रकरणी अंतिम निर्णय घेत नाही आणि लाचलुचपत विभागाला पुढील कारवाईसाठी मंजुरी देत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा निर्धार खरात यांनी व्यक्त केला आहे. या उपोषणामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर खळबळ माजली आहे. आता यावर राज्य शासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button