महापुरुषांशी निगडित शाळांना अनुदानाचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नावर शासनाचे स्पष्टीकरण

कुंभोज व अमळनेरच्या शाळांना अनुदानाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट; योग्य कार्यवाहीचे आश्वासन
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील महापुरुषांशी संबंधित ऐतिहासिक शाळांना अनुदान देण्याच्या मुद्द्यावर आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत अतारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुंभोज गावातील शाळा तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील साने गुरुजी यांच्याशी निगडित शाळेला शासनाच्या शैक्षणिक दर्जा उन्नत करण्याच्या योजनेतून वगळण्यात आल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
प्रश्नामध्ये आमदार खडसे यांनी नमूद केले की, शासनाने महापुरुषांच्या ऐतिहासिक गावांतील १३ शाळांच्या विकासासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, या यादीत कुंभोज आणि अमळनेर येथील ऐतिहासिक महत्त्वाच्या शाळांचा समावेश न झाल्याने स्थानिक नागरिक व ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, या शाळांनाही अनुदान देण्याची मागणी होत आहे.
यावर शालेय शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले की, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त तत्कालीन अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात महापुरुषांशी संबंधित १० ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विधानमंडळ सदस्यांच्या मागणीनुसार आणखी तीन शाळांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार ७ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे १३ ऐतिहासिक गावांतील शाळांच्या विकासासाठी १४.३० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली.
शासनाने पुढे स्पष्ट केले की, या योजनेसाठी केंद्र सरकारकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निधी उपलब्ध झाला होता आणि तो ऐतिहासिक गावांतील शाळांच्या विकासासाठी ‘एकवेळेचे विशेष अनुदान’ म्हणून वितरित करण्यात आला. मात्र, कुंभोज येथील शाळेचा या यादीत समावेश नसल्याने त्या शाळेला निधी उपलब्ध करून देण्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाशी सल्लामसलत सुरू असून, योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याचेही शासनाने स्पष्ट केले.
महापुरुषांच्या कार्याशी संबंधित शाळांच्या जतन व विकासासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



