बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर नियमांची कडक अंमलबजावणी – जिल्हा पुरवठा विभागाचा इशारा…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- २६ मार्च २०२६
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ७ महत्त्वाचे आदेश जारी; नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार
जिल्हा पुरवठा विभाग, बुलढाणा यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना महत्त्वाचे आदेश जारी केले असून, ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिनांक 26 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशात पेट्रोल पंपांवर पारदर्शकता राखणे, मोजमाप अचूक ठेवणे आणि ग्राहकांना योग्य सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशानुसार, प्रत्येक पेट्रोल पंपावर मोजमाप यंत्रणा अचूक आणि प्रमाणित असणे आवश्यक असून, त्याची नियमित तपासणी करणे बंधनकारक आहे. तसेच, पंपावर येणाऱ्या ग्राहकांना स्पष्ट पावती देणे, दरपत्रक दिसेल अशा ठिकाणी लावणे आणि कोणतीही फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
याशिवाय,डिझेल पेट्रोल कोणत्याही परिस्थितीत खुल्या कॅन, बादली, डबा किंवा अशा कोणत्याही भांड्यात देण्यात येणार नाही. आणि आपत्कालीन सेवांसाठी ॲम्ब्युलन्स व इतर शासकीय वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करणे, तसेच पंप परिसरात स्वच्छता आणि सुरक्षा राखणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये परवाना रद्द करणे किंवा दंडात्मक कारवाईचा समावेश असू शकतो.
ग्राहकांनीही पेट्रोल भरताना जागरूक राहावे, पावती घ्यावी आणि कोणतीही तक्रार असल्यास संबंधित विभागाकडे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियम पाळा, ग्राहकांचा विश्वास जिंका जिल्हा पुरवठा विभागाचे पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट संदेश….✍️



