देऊळगाव राजा शहराचा कायापालट: ‘डॅशिंग’ मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचा ५ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:प्रशासकीय शिस्त, धडक निर्णयक्षमता आणि लोककल्याणकारी दृष्टीकोन या बळावर देऊळगाव राजा शहराला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेणारे ‘डॅशिंग’ आणि कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मा. श्री. अरुणजी मोकळ साहेब यांनी आज आपल्या मुख्याधिकारी पदाचा ५ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्या या ५ वर्षांच्या ऐतिहासिक कार्यकाळात देऊळगाव राजा शहराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला असून, त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर शहरात एक वेगळी आणि आदर्श ओळख निर्माण केली आहे.
गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे ऐतिहासिक काम मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी करून दाखवले आहे. यामध्ये प्रामुख्याने ७० वर्षांपासून प्रलंबित असलेला ऐतिहासिक डीपी रोडचा प्रश्न अत्यंत धाडसाने आणि यशस्वीपणे मार्गी लावला. याशिवाय शहरातील अनेक अडथळे असलेले रस्ते मोकळे करणे, गटारी (नाली) व सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे, नवीन नळ पाईप लाईन टाकून पाणीपुरवठ्याची समस्या कायमची सोडवणे, आणि शहर स्वच्छतेचा दर्जा उंचावणे या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी अमूल्य सुधारणा केल्या आहेत.
शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी जळगाव राजा शहरात एकाच ठिकाणी आकर्षक ‘नाना-नानी पार्क गार्डन’ ची निर्मिती करून त्यांनी ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी एक उत्तम भेट दिली आहे. केवळ भौतिक विकासच नाही, तर लोकाभिमुख प्रशासनाद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न वेळेत निकाली काढण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
देऊळगाव राजा शहराला विकासाचा नवा चेहरा देणाऱ्या अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या ५ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त संपूर्ण देऊळगाव राजा शहरातून आणि विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



