तेल्हारा शहरात घाणीचे साम्राज्य! नागरिकांचे आरोग्य धोक्यात! मात्र नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
तेल्हारा दि.10 फेब्रु. 2025 l
हल्ली तेल्हारा शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून नागरी सेवा सुविधांचा मोठा प्रश्न उद्भवत आहे . याचे ताजे दृश्य तेल्हारा परिसरातील गौतमा नदी परिसरात बघावयास मिळत आहे हि अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात जागृत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला रीतसर निवेदनाद्वारे सुद्धा मागणी केलेली आहे मात्र अद्याप पर्यंत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही . त्यामुळे नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत गेले असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

तेल्हारा शहरातील नदीकाठी वास्तव्यास असलेले शिवाजी चौक येथील श्रीकृष्ण जामोदे यांचे घरापासून ,आसरामाता मदिरा ते डांबरे महाराज समाधी मंदिर परिसरापर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या गौतमा नदीत व नदी भवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या , झाडाच्या फांद्या- पाचोळा इतर कचरा अनेक दिवसापासून नदीवर बांधलेल्या आडव्या चार पुलाच्या खालच्या भिंतीला अडकलेला असून नदीमध्ये जल वाहून नेणाऱ्या प्रिकॉस्ट सिमेंट काँक्रीट च्या पाईपलाईन (जलवाहिन्या) पडलेला आहेत. ज्याची लांबी सुमारे 10′ ते 20′ फूट व त्यांचा व्यास साधारण 3′ ते 4′ फूट असेल अशा स्वरूपाच्या पाईपलाईन नदी पात्रात गेल्या अनेक महिन्यांपासून विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला असून यामुळे सांडपाणी साचून नदी काठाच्या परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हा मोठा धोका निर्माण झाला असून यामध्ये जीवित हानी सुद्धा होऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही . हि अतिशय गंभीर बाब असून नगरपरिषद प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे याप्रसंगी लक्षात येते. याबाबत नदी काठावरील वास्तव्यास असलेल्या जागृत नागरिकांकडून प्रशासनाला गेल्या आठवड्यात निवेदन सुद्धा देण्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे तेल्हारा नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोप घेत असल्याच्या नागरिकांमधील चर्चेला परिसरात चांगलेच उधान सुटले आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने संवेदनशीलपणे या बाबीची जबाबदारी व दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी तसेच मानवी जीवितास हानी होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना मुक्त करावे व स्वच्छ भारत प्रमाणे हा परिसर सुद्धा स्वच्छ करावा अशी मागणी हल्ली नागरिकांकडून जोर धरत होत आहे.



