आई जगदंबेला टाळ मृदुंगाच्या गजरात भावपूर्ण निरोप – चिमुकल्या वारकऱ्यांनी भाविकांच्या मनात साद घातली

इसोली, ता. चिखली –
ग्रामपंचायत चौक, इसोली येथे जय भवानी दुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीस भावनिक आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा नजारा पाहायला मिळाला. गावकऱ्यांच्या “जगदंबे मातेच्या जयघोषात” संपूर्ण चौक दुमदुमून गेला, आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात आई जगदंबेला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या मिरवणुकीमध्ये खास आकर्षण ठरले ते श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी संस्था संचलित अनाथ आश्रम, साबरा (ता. मेहकर) येथील चिमुकल्या वारकऱ्यांचे टाळ-मृदुंग वादन. या बाल वारकऱ्यांनी आपल्या भक्तिभावाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. टाळांच्या गजरात, मृदुंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या घोषात त्यांनी जगदंबेच्या मूर्तीला नृत्य करत निरोप दिला. वारीच्या पारंपरिक पद्धतीने, शांतता राखून आणि भक्तीचा भाव मनात ठेवून त्यांनी विसर्जन सोहळा अधिकच मंगलमय केला.
“श्रीराम जय राम जय जय राम” च्या नामस्मरणात, भक्तांच्या ह्रदयात घर करणाऱ्या या देखाव्याने अनेकांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावना जागृत केली. या मिरवणुकीत गावातील नागरिक, महिला, लहान मुले, आणि वयोवृद्ध यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गावकऱ्यांनीही या चिमुकल्यांचे विशेष कौतुक केले.
आई जगदंबेला अशा भक्तिभावाने निरोप देताना संपूर्ण इसोली गाव एकत्रित झाला होता, आणि हा क्षण गावाच्या आठवणीत कायमचा कोरला गेला.



