टाकरखेडा भागिले गावच्या शेतकरी पुत्राची गरुडझेप; रुपेश ताठेची इंग्लंडच्या ‘मिनी काऊंटी’ क्रिकेटसाठी निवड!

विमानाने इंग्लंडकडे रवाना; देऊळगाव राजा परिसरात कौतुकाचा वर्षाव
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :तालुक्यातील टाकरखेडा भागिले या ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपल्या कौशल्याच्या जोरावर थेट क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच इंग्लंडमध्ये धडक मारली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रूपेश रघुनाथ ताठे याची इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘मिनी काऊंटी क्रिकेट’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी रुपेश विमानाने इंग्लंडकडे रवाना झाला आहे.
रूपेशचे वडील रघुनाथ नामदेव ताठे हे पेशाने शेतकरी आहेत. अत्यंत साधारण ग्रामीण परिस्थितीतून आलेल्या रूपेशने लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जोपासली होती. सोयी-सुविधांचा अभाव आणि आर्थिक ओढाताण अशा प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता, त्याने नियमित सराव, अफाट मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर क्रिकेटमधील आपले कौशल्य विकसित केले.
स्थानिक पातळीवरील मैदानांपासून सुरू झालेला रूपेशचा हा क्रिकेट प्रवास आता थेट इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंत पोहोचला आहे. इंग्लंडच्या मिनी काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळणे, ही रूपेशच्या आजवरच्या अथक परिश्रमाला आणि चिकाटीला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.
ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी पुत्राने थेट परदेशातील मानाच्या क्रिकेट स्पर्धेत खेळण्यापर्यंत मारलेली मजल ही संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. रूपेशच्या या ऐतिहासिक यशामुळे टाकरखेडा भागिले गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



