सकस आहार व नियमित विहार आरोग्यवर्धक : प्रा.डॉ.बाळासाहेब वाघ

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : सकस आहार व नियमित विहार आरोग्यवर्धक असल्याचे प्रतिपादन आहार तज्ञ प्रा. डॉ . बाळासाहेब वाघ यांनी केले .ते रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय मालेगाव येथे रासेयो स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोषण माह अंतर्गत संतुलित आहार व नियमित विहार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते .ते पुढे म्हणाले की रात्रीची आठ तास गाढ झोप , सकारात्मक विचारसरणी, नियमित व्यायाम , निर्व्यसनी जीवनशैली ,भरपूर पाणी प्राशन करणे , फळांचा रस प्राशन करणे, ऋतूनुसार फळे खाणे , हिरव्या पालेभाज्या खाणे , डाळींचा आहारात समावेश करणे शरीराला आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले .तसेच पॅकिंग फूड ,तळलेले व मसालेदार पदार्थ ,अति उष्ण व ती थंड पदार्थ खाणे टाळावे . रवा , मैदा , मीठ व साखरेचा आहारात कमी वापर करण्याचा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला .शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गुळ व शेंगदाण्याचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला .दुसरे मार्गदर्शक प्रा . नंदकिशोर गायकवाड यांनी रासेयोच्या विविध कार्यक्रम व उपक्रमात रासेयो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन रासेयोमधून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा मूलमंत्र उपस्थितांना दिला . रासेयोचे नियमित व विशेष शिबिर असे दोन भाग असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले .अध्यक्षीय भाषणात महिला रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा . डॉ . लता जावळे म्हणाल्या की रासेयो हे विद्यार्थ्यांचे हक्काचे विचारपीठ आहे की ज्याद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास साधल्या जातो . रासेयो स्वयंसेवकांनी चौकस, चोखंदळ ,चतुर बनून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले .तसेच रासेयो स्वयंसेवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहून निकोप व निरोगी समाज निर्मितीला चालना देण्याचा सल्लाही त्यांनी दिला .प्रास्ताविक भाषणातून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा . डॉ . दिपक जमधाडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा रेखाटून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला . रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थी सद्गुणी बनतात असे त्यांनी निक्षून सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .शिवानी खिल्लारीने तर आभार प्रदर्शन कु .पूजा तायडेने केले .त्यानंतर रासेयो स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने व अभिवादनाने झाली .हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . योगेश्वर निकस यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला .या कार्यक्रमाला प्रा . डॉ . संजय ताजने, प्रा . डॉ . भिमराव जांभरुणकर , प्रा . डॉ . उषा गौरकर , प्रा . प्रशांत खोटे , प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



