Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

भगवान बुद्धांच्या पंचशीलाचा संदेश मानवकल्याणाचा मार्ग; जेटवन बुद्ध विहारात ग्रंथपठणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव :

भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला पंचशीलाचा उपदेश हा केवळ धार्मिक शिकवण नसून मानवी जीवनाला दिशा देणारे सार्वकालिक जीवनमूल्य आहे. हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य आणि मद्यपान यांचा त्याग करून पंचशीलाचे आचरण करणाऱ्या व्यक्तीचे जीवन अधिक शांत, संयमी आणि प्रसन्न बनते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.अजिंठा हाउसिंग सोसायटी येथील जेटवन बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीत आयोजित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथपठण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव यांनी वर्षावासाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. भगवान बुद्धांनी सारनाथ येथील मृगदाय वनात प्रथम वर्षावास केला असून, या परंपरेचे स्मरण म्हणून महाराष्ट्रातील बुद्ध विहारांमध्ये या तीन महिन्यांत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे नियमित पठण केले जाते, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. आनंद कोचुरे होते. बौद्ध धर्मातील समता, करुणा आणि मानवकल्याणाची तत्त्वे समाजापर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक उपासकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन दिलीप सपकाळे यांनी केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेचे ऐतिहासिक महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता बैसाने यांनी केले, तर कविता सपकाळे यांनी आभार मानले. पूनम वानखेडे, संगीता सैंदाणे, वर्षा कोचुरे आणि लता बिऱ्हाडे यांनी त्रिशरण व पंचशीलाचे पठण केले. सिंधू तायडे, विजया शेजवळे, लक्ष्मी भालेराव, हिराबाई भालेराव आणि नूतन तासखेडकर यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा परिचय सरला भालेराव व माया भालेराव यांनी करून दिला.या प्रसंगी रामकृष्ण सावळे, मनोज इंगळे, बळीराम गजरे, प्रतिभा सपकाळे, पूजा कोचुरे, अंजना भालेराव, आशा सपकाळे, गीता सोनवणे, शुभांगी बोदोडे, सुमन सोनवणे, उषा गांगले, मीना बिऱ्हाडे, रंजनी सैंदाणे, सुनंदा सैंदाणे तसेच मोठ्या संख्येने उपासिका आणि धम्मप्रेमी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button