ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी?

आशा स्वयंसेविकांना केस पेपर काढण्यासह साफसफाईची कामे करण्यास भाग पाडल्याचा आरोप; मानधन न काढण्याच्या धमक्या
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
( आवाज न्यायाचा )
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विनोद तायडे
ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत आशा स्वयंसेविकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, त्यांना त्यांच्या नियमित जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त विविध कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काम करण्यास नकार दिल्यास मानधन काढले जाणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार काही आशा स्वयंसेविकांनी केली आहे.
ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा स्वयंसेविका मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. आरोग्य विभागाच्या विविध योजना व आरोग्यविषयक जनजागृती करणे, घरोघरी भेटी देऊन नागरिकांना आरोग्य सेवांची माहिती देणे तसेच शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्या कार्यरत असतात. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नियमित कामांव्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर स्वरूपाची कामेही करून घेतली जात असल्याचा आरोप आहे.
आशा स्वयंसेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात केस पेपर काढण्यासाठी दररोज ड्युटी लावून बोलावले जाते, तसेच दवाखान्यातील साफसफाई आणि ऑनलाइन स्वरूपाची कामेही त्यांच्याकडून करून घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित कामे करण्यास नकार दिल्यास मानधनाबाबत अडचणी निर्माण केल्या जातील, अशी भीती दाखवली जात असल्याचा आरोपही काही आशा स्वयंसेविकांनी केला आहे.
या प्रकारामुळे आशा स्वयंसेविका मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात असून, मानधन बंद होण्याच्या भीतीपोटी त्या अतिरिक्त कामे करण्यास मजबूर होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांची अधिकृत कर्तव्ये कोणती आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारची अतिरिक्त कामे करून घेण्यास संबंधित नियमांमध्ये परवानगी आहे का, याची प्रशासनाने स्पष्टता करणे गरजेचे आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. आशा स्वयंसेविकांवर अतिरिक्त कामांसाठी दबाव आणला जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी तसेच आशा स्वयंसेविकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



