बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री क्षेत्र लाखोंडा : परमसंत श्री परमहंस परशराम महाराजांच्या भक्तीचे अखंड दीपस्थान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

महाराष्ट्रभूमीत संतपरंपरेची अखंड गंगा वाहत राहिली आहे. त्याच पवित्र परंपरेत एक दिव्य ज्योत प्रकट झाली– श्री परमहंस परशराम महाराज. त्यांच्या लीलामय चरित्रात अनेक श्रीक्षेत्रे उजळून गेली, परंतु त्यांच्या भक्ती-भावनेचे सर्वाधिक जिवंत व सक्रिय केंद्र आजही* श्री क्षेत्र लाखोंडा
येथे स्पंदत आहे. जिल्हा अकोला येथील या छोटेखानी पण परमपावन गावाने महाराजांच्या जन्मोत्सव, पुण्यतिथी उत्सवामध्ये दहा ते पंधरा पोते गव्हाच्या पोळ्यांचा भंडारा होतो व तसेच मासिक पारायण यांना आपल्या प्राणात सामावून घेतले आहे. लाखोंडा हे केवळ एक गाव नाही; ते महाराजांच्या कृपादृष्टीचे साक्षात मंदिर आहे.

सन १९०० मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिवशी, श्रीक्षेत्र जळतापूर (तालुका भातकुली, जिल्हा अमरावती) येथे स्वर्गीय बळीरामपंत वडनेरकर (गुरव) व स्वर्गीय भिमाबाई बळीरामपंत वडनेरकर यांच्या घरी साक्षात शिवशंकर अवतरले. जन्मताच लिहिला दाखवणारे ते बालक बालवयातच भटकंती करू लागले. विविध श्रीक्षेत्रांवर त्यांनी लीला केल्या. होळी पौर्णिमा सन १९५१ मध्ये श्रीक्षेत्र इंझा (वनश्री) – त्याकाळी अकोला जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यात, आज वाशिम जिल्ह्यात – येथे त्यांनी वैकुंठगमन केले. एकूण एक्वन्न वर्षे त्यांनी भक्तांना भक्ती, समता व दिव्य अनुभवाचा संदेश दिला.

महाराजांचा जास्त कार्यकाळ श्रीक्षेत्र पिंपळोद येथे गेला. तेथे स्वर्गीय भक्त देशमुख व इतर भक्तांच्या आग्रहास्तव त्यांची संजीवन समाधी आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ प्रशस्त मंदिर उभे आहे. पिंपळोद ते येवदा रोडवर महाराजांनी निर्माण केलेल्या अमृतमय जलकुंडाजवळ स्वर्गीय डोरस गुरुजींच्या पुढाकाराने व श्री अशोकराव भारसाखळे यांचे स्वर्गीय चिरंजीव यांच्या निरंतर भक्तीने सुबक मंदिर उभारले गेले आहे. ही सर्व स्थाने महाराजांच्या लीलांची साक्ष देतात.

परंतु श्री क्षेत्र लाखोंडा हे आज महाराजांच्या भक्तिपरंपरेचे सर्वाधिक सक्रिय व भावपूर्ण केंद्र बनले आहे. येथील मंदिराचे अध्यक्ष सन्माननीय शंकररावजी खवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ट्रस्टी, गावकरी व भक्तजन एकत्र येतात. महाराजांचा जन्मोत्सव, पुण्यतिथी, मासिक पारायण व इतर उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. गावातील सासरवासीनी मुली आई-वडिलांकडे दिवाळीला न येताही महाराजांच्या उत्सवासाठी आवर्जून धावत येतात. लहान-मोठे सर्व गावकरी उत्साहात सहभागी होतात. लाखोंडा येथे महाराज केवळ पूज्य नव्हेत; ते गावाचे प्राण आहेत, त्यांचे संस्थान गावाच्या हृदयात धडधडते.

श्री परमहंस परशराम महाराजांनी विविध लीला व चमत्कार करून भक्तांना भक्तीचा व समानतेचा संदेश दिला. त्या संदेशाचे साक्षात रूप आज लाखोंडा येथे दृग्गोचर होते. जिथे गावकरी एकत्र येतात, जिथे भक्तीची नदी वाहते, जिथे महाराजांची कृपा प्रत्यक्ष अनुभवास येते – तेच हे श्रीक्षेत्र लाखोंडा.

श्री क्षेत्र लाखोंडा हे केवळ भौगोलिक स्थान नसून महाराजांच्या दिव्य साक्षित्वाचे जिवंत केंद्र आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त महाराजांच्या कृपादृष्टीचा अनुभव घेतो. लाखोंडाच्या या अखंड भक्तिदीपाने महाराजांचे चरित्र चिरंतन उजळून राहील, हे निःसंशय.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button