विवाहाचे आश्वासन देत तीन वर्षे अत्याचार; भुसावळात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी
लग्नाचे आश्वासन देऊन एका तरुणीची तब्बल तीन वर्षे फसवणूक करत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात संबंधित तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करू, असे आश्वासन देत ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मात्र, विवाहाबाबत टाळाटाळ करून अखेर फसवणूक झाल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी आदित्य ब्रजेश वत्स, त्याचे वडील ब्रजेश कुमार सिंह आणि आई सीमा ब्रजेशकुमार सिंह (रा. मेघ मल्हार सोसायटी, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.



