ग्राहक मंचाचा वीज वितरण आणि सौर ऊर्जा कंपनीला मोठा दणका; शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी –शंकर शिवरकर
देऊळगावराजा :प्रशासकीय दिरंगाई आणि कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध मौजे डोड्रा (ता. देऊळगाव राजा) येथील एका तरुण शेतकऱ्याने ग्राहक मंचात दिलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. विहीर असूनही ‘पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही’ असे खोटे कारण दाखवून सौर कृषी पंप देण्यास नकार देणाऱ्या वीज वितरण कंपनी आणि महाऊर्जाच्या अधिकृत कंपनीला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे.
काय आहे सविस्तर वृत्त?
मौजे डोड्रा येथील रहिवासी आणि तरुण शेतकरी प्रथमेश भास्कर शिंदे यांची मौजे डोड्रा शिवारात गट नं. २२ मध्ये १.६८ आर शेती आहे. शेतीच्या सिंचनासाठी त्यांनी २०२२ मध्ये स्वतःच्या शेतात विहीर खोदली. त्यानंतर त्यांनी रीतसर वीज पुरवठ्याची मागणी केली होती. सुरुवातीला १३ फेब्रुवारी २०२२ रोजी महावितरणकडे अर्ज करूनही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने’अंतर्गत (कुसुम योजना) सौर पंपासाठी अर्ज दाखल केला.या अर्जाचा पाठपुरावा केल्यानंतर २९ मे २०२३ रोजी त्यांचा सौर पंपाचा अर्ज मंजूर झाला. त्यानुसार नियमाप्रमाणे ११,३८५ रुपयांचे कोटेशन मंजूर झाले आणि शेतकऱ्याने त्याच दिवशी संपूर्ण रकमेचा भरणा केला. यानंतर कुसुम योजनेच्या नियमानुसार हा अर्ज ‘महाऊर्जा’ (MEDA) कडे हस्तांतरित करण्यात आला.
सर्व्हे झाला, पैसे घेतले आणि शेवटी फसवणूक!
महाऊर्जाने त्यांच्या अधिकृत कंपनीमार्फत ३ मार्च २०२४ रोजी शेतकरी प्रथमेश शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला. त्यांना चिखली येथील कार्यालयात बोलावून घेऊन पंपाची संपूर्ण रक्कम जमा करून घेतली. त्यानंतर १३ मार्च २०२४ रोजी संबंधित वायरमन आणि तंत्रज्ञांनी शेतात जाऊन जागेचा प्रत्यक्ष सर्व्हे (जागा पाहणी) देखील केला.परंतु, यानंतर उपविभागीय कार्यालयाकडून कोणतीही योग्य चौकशी न करता, केवळ कागदोपत्री ‘शेतात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही’ असे अजब व खोटे कारण पुढे करण्यात आले. वास्तविक पाहता शेतकऱ्याने स्वतः पैसे खर्च करून विहीर खोदलेली असतानाही, कंपन्यांनी केवळ टाळाटाळ करण्यासाठी शेतकऱ्याचा सौर पंप नाकारला.या मनमानी कारभारामुळे आणि झालेल्या अन्यायामुळे शेतकरी प्रथमेश शिंदे यांनी थेट ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचाने सर्व कागदपत्रे, विहिरीची उपलब्धता आणि भरलेले पैसे तपासून वीज वितरण व महाऊर्जाच्या संबंधित कंपनीला दोषी धरत शेतकऱ्याच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे डोदा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मनमानी करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.



