बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बकरीच्या पैशाच्या वादातून व्यक्तीची काठीने मारून हत्या; पाडळी शिंदे येथील खळबळजनक घटना, अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

अंढेरा (बुलढाणा): तालुक्यातील पाडळी शिंदे येथे बकरीच्या पैशाच्या वादातून एका व्यक्तीची डोक्यात काठी मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी शिंदे येथील मृतक आणि आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत.
मृतकाने लावलेल्या विजेच्या करंटमुळे आरोपीची बकरी मृत पावली होती. त्या बकरीची नुकसान भरपाई म्हणून आरोपी मच्छिंद्र सरोदे हा मृतकाकडे पैशांची मागणी करत होता. याच बकरीच्या पैशांच्या वादावरून दिनांक ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान आरोपी मच्छिंद्र माणिकराव सरोदे व त्याच्या एका अज्ञात साथीदाराने मृतकाच्या डोक्यात काठीने जबर मारहाण करून त्याला जीवे ठार मारले.

या धक्कादायक घटनेप्रकरणी प्रियंका राहुल खरात (वय ३०, रा. पीरकल्याण, ता. जि. जालना) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मच्छिंद्र माणिकराव सरोदे (रा. पाडळी शिंदे) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजि. नं. ०२५५/२०२६ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यामध्ये बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनी रुपेश शक्करगे यांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासाच्या दृष्टीने फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, पोलिसांनी ‘इ-साक्ष’ प्रणालीद्वारे आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

हा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब मुंढे यांनी केले असून, पुढील तपास अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे स्वतः करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button