तेल्हारा येथील शेगाव नाका परिसरातील सुरक्षा विषयक मागण्या प्रलंबित; गोकुळ हिंगणकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
बातमी संकलन – विजय घोडे
जिल्हा प्रतिनिधी :
तेल्हारा शहरातील अत्यंत वर्दळीचा व अपघातप्रवण समजला जाणारा शेगाव नाका परिसर येथे आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत गाडेगावचे सदस्य गोकुळ रामदास हिंगणकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात हिंगणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. त्यांनी सांगितले की, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी शेगाव नाका परिसरात गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक तसेच जनजागृतीपर बॅनर उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
शेगाव नाका परिसरात तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, रुग्णालय तसेच इतर शासकीय कार्यालये असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी यांची ये-जा सुरू असताना भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनात गाडेगाव रोड व हिवरखेड-शेगाव मार्गावर तातडीने गतिरोधक बसविणे, झेब्रा क्रॉसिंगची पांढरी पट्टी मारणे, ‘वेग कमी ठेवा’, ‘शासकीय कार्यालय परिसर’ व ‘वर्दळीचा भाग’ असे फलक उभारणे तसेच जनजागृतीसाठी सूचना फलक व बॅनर लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर जनहितार्थ बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल. उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संबंधित प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशाराही गोकुळ हिंगणकर यांनी दिला आहे.



