पांदण रस्त्यात बसत नसलेल्या नाल्यातून शेतरस्ते असलेल्या शेतकऱ्यांचे बेहाल.

पांदण रस्त्यात बसत नसलेल्या नाल्यातून शेतरस्ते असलेल्या शेतकऱ्यांचे बेहाल.
हिवरखेड (वार्ताहर )
तेल्हारा तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका म्हणून ओळखल्या जातो. त्यातल्यात्यात हिवरखेड म्हणजे जणूकाही निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिलेले शहर. सुपीक कसदार जमीन, मुबलक पाणी, शासनाच्या योजना व कष्टाळू शेतकरी यांच्या सांगडीने येथील शेतकरी नेत्रदीपक प्रगती करतो आहे.येथील शेतकऱ्यांची एक वेगळीच समस्या आहे. या शहराला लागून अनेक नाले आहेत व पिढ्यानंपिढ्या पासून हे शेतकरी या नाल्याने आपल्या मालाची वाहतूक करतात.पण अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होऊ लागल्याने या शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्याची वाताहात झाली असून ज्या रस्त्याने बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर जात होते व पावसाळ्यामध्ये सुद्धा ज्या रस्त्यावर चिखल होत नव्हता त्या रस्त्याने आज पायी चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. अवैध वाळू व रेती उपसा करणारे जेसीबीच्या साहाय्याने बेसुमार उत्खनन करत आहेत.त्यामुळे या नाल्यातील रस्त्यामध्ये मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे.बेसुमार उत्खनन केल्यामुळे या वाळू रेतीच्या कडक रस्त्यावर आता चिखल होऊ लागला आहे व शेतकऱ्यांची वाहने यामध्ये फसत आहेत. हे नाले शासनाच्या पांदण रस्त्यात बसत नसल्यामुळे शासन सुद्धा या नाल्यातील रस्त्याबाबत उदासीन आहे. यामुळे आता न्याय मागावा तो कुणीकडे अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.तेल्हारा तालुक्यात अशा नाल्यांची संख्या खुप जास्त असून गावोगावी शतकऱ्यांना ही समस्या भेडसावत आहे अवैध वाळू व रेती उपस्यावर बंदी असली तरी ती फक्त कागदोपत्री असून हे वाळू तस्कर कोण आहेत याची खडानखडा माहिती महसूल व पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना आहे. मात्र या वाळू माफिया सोबत अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांच्यावर थातुरमातूर कारवाई करून एकप्रकारे अधिकाऱ्यांकडूनच या माफियांना अभय दिल्या जात असल्याची सगळीकडे चर्चा आहे .या क्षेत्रातील माफिये राजरोसपणे अंधाधुंदपणे उत्खनन करत शेतकऱ्यांचे शेतरस्ते बंद करत आहेत. याचा फटका म्हणजे या रस्त्यावरील शेतीचे भाव पडत आहेत तसेच याचा गंभीर परिणाम भुजल पातळीवर होत असून तालुक्यातील भुजल पातळी झपाट्याने घटत आहे.तरी शासनाने या संपूर्ण गोंधळातून शेतकऱ्यांना मार्ग काढून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
प्रतिक्रिया.
1-नाले हे नैसर्गिक जलस्रोत आहेत. शासन नाल्यांचे रुंदीकरण वा खोलीकरण करू शकते पण या नाल्यात पांदण रस्ता करता येत नाही.
महेश रामगुंडे तहसीलदार तेल्हारा.
2-शेतकऱ्यांची ही समस्या शासनासमोर मांडून यातून तोडगा काढण्याचा निश्चितच प्रयत्न करेल.
डॉ. संजय शर्मा
सह अध्यक्ष मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना अकोट विधानसभा
3-अवैध वाळू उपस्यावर पूर्णपणे बंदी असून असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कठोर कारवाई केल्या जाईल.
सचिन पाटील ठाणेदार हिवरखेड
4-अवैध वाळू उपसा करणारे रात्री अपरात्री वाळू उपसा करतात. मी यापूर्वी अनेक कारवाया केल्या असून असे प्रकार करणाऱ्यावर यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.
समीर खान तलाठी भाग क्रं. 1 हिवरखेड
5-हे रस्ते शासनाच्या नियमात बसत नसले तरी शासनाने विशेष तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांची समस्या सोडवावी.
शामशील भोपळे
नालाग्रस्त शेतकरी तथा नगरसेवक हिवरखेड
6-शासनाने नियमानुसार किंवा नियमबाह्य कोणतीही उपाययोजना करून आमची समस्या सोडवावी अन्यथा आमच्यावर शेती करणे अशक्य होऊन आत्महत्या करण्याची वेळ येईल.
विठ्ठल कसुरकार
नालाग्रस्त शेतकरी



