काँग्रेसच्या नॅशनल टॅलेंट हंट अमरावती विभागीय समन्वयकपदी राहुलभाऊ बोंद्रे

*
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली (प्रतिनिधी)
आरुना दत्तात्रय खंडागळे
बुलढाणा : राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना आता काँग्रेसने ‘आक्रमक’ संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. केवळ पारंपरिक पद्धतीने कार्यकर्त्यांच्या फळीवर अवलंबून न राहता, पक्षाचे विचार, वारसा आणि संविधानावर निष्ठा असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसने राज्यभर ‘प्रतिभा शोध अभियान’ (टॅलेंट हंट) सुरू केले आहे. या अभियानाच्या अमरावती विभागीय समन्वयकपदी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांची निवड झाली आहे.
“जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतील अशा तळागाळातील सक्षम व्यक्तींना ओळखणे, प्रशिक्षण देणे आणि सक्षम करणे हे प्रतिभा शोध अभियानाचे ध्येय आहे. या कार्यक्रमांतर्गत, काँग्रेस तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रतिभेचा शोध घेत आहे. यात निवड झालेल्यांना संशोधन विश्लेषक, प्रवक्ते तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
राहुलभाऊ बोंद्रे यांनी यापूर्वी कर्नाटक व मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी निरीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर आता पक्षाने नॅशनल टॅलेंट हंट अमरावती विभागीय समन्वयकपदी राहुलभाऊ बोंद्रे यांची केलेली नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.



