शेगाव येथे श्री मुकिंदा गव्हांदे यांची ‘स्टार भारत लाईव्ह’च्या जळगाव जामोद प्रतिनिधीपदी घोषणा
शेगाव (दि. २२ फेब्रुवारी) – व्यंकटेश नगर येथील वैष्णवी मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात स्टार भारत लाईव्हचे संपादक यांच्या हस्ते श्री मुकिंदा गव्हांदे यांचा शाल, श्रीफळ व ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांची स्टार भारत लाईव्हच्या जळगाव जामोद प्रतिनिधी म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमास पत्रकार परिवारातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. रतन भगत, जी. डी. रोकडे, वेंगड सर, राजेंद्र मुंडे, अरुणा खंडागळे, श्याम पहुरकर व रामा इंदोरे आदी मान्यवरांनी श्री गव्हांदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संपादक सचिन झनके यांनी आपल्या भाषणात स्थानिक पातळीवर सक्षम, निष्ठावान आणि निर्भीड प्रतिनिधी असणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. जळगाव जामोद तालुक्यातील विविध घडामोडी वस्तुनिष्ठपणे व निर्भीडपणे जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी श्री मुकिंदा गव्हांदे समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री मुकिंदा गव्हांदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “स्टार भारत लाईव्हच्या जळगाव जामोद प्रतिनिधीपदी माझी निवड झाल्याबद्दल मी संपादक आदरणीय सचिन झनके सर तसेच सर्व मान्यवरांचा मनःपूर्वक आभारी आहे. माझ्यावर टाकलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्न, सामान्य नागरिकांचा आवाज आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचे प्रभावी साधन आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, प्रशासनिक व इतर क्षेत्रांतील घडामोडी प्रामाणिकपणे व वस्तुनिष्ठपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करेन.”
कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थितांनी नवनियुक्त प्रतिनिधीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



