महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे शिखर : पंढरीची वारी. वेदप्रामाण्यवादी वैष्णव संप्रदायाच्या अग्रणी व प्रवृत्तीशी अविरोधी आणि निवृत्तीचा पुरस्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे शिखर : पंढरीची वारी. वेदप्रामाण्यवादी वैष्णव संप्रदायाच्या अग्रणी व प्रवृत्तीशी अविरोधी आणि निवृत्तीचा पुरस्कार करणारा वारकरी संप्रदाय हा अनुष्ठान निरपेक्ष आस्था प्रधान आहे. त्यामध्ये संतांनी सर्व व्यक्तिगत साधनेचे सार्वजनिकरण करून, भगवद्प्राप्तीच्या खडतर मार्गाला स्वतःच्या साधनसिद्धतेणे लोक सुलभ बनविले आहे. त्यामुळेच सर्व वारकरी काकड आरती पासून तर, हरिपाठापर्यंत प्रत्येक साधना हे सार्वजनिक स्वरूपाची करीत असल्याचे निदर्शनास येते. परिणामी वर्णाश्रमाच्या भिंती नैसर्गिकरित्या कोलमडून , त्याठिकाणी सामूहिक भक्ती करिता सामाजिक सामरस्याचे भव्य प्रांगण निर्माण झाले आहे. त्यावर अठरापगड जाती जमातीच्या आबालवृद्धांना कुठल्याही स्पृश्यास्पृस्य भेदभावाशिवाय ” अवघी एकाचीच वीण l तेथें कैंचे भिन्नभिन्न l वेदपुरुष नारायण l तेणें केला निवाडा ll” या तुकोक्तीनुसार आपण एकाच ईश्वराचे लेकर आहोत या एकत्वाच्या बोधावर आरुढ होऊन, ते सर्व त्यावर मनसोक्त भजनानंदाचा सोहळा उपभोक्तांना दिसून येतात. त्यातही संपूर्ण विश्वालाच आपले घर मानुन , आपल्या श्रीगुरुंना विश्वात्मकदेव संबोधणाऱ्या विश्व माऊली भगवानश्री ज्ञानोबारायांनी ज्ञानोत्तर भक्तीप्रेमाचा पुरस्कार करीत, ज्ञान गिळून गोविंद गाण्या साठी भागवत धर्माच्या भक्तीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन ” माझी जिवींची आवडी l पंढरपुरा नेईन गुढी ll” या वचनपूर्तीर्थ आरंभलेली पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे शिखरच आहे. परंपरा निर्माण करणे सोपे परंतु ते टिकविणे फारच कठीण असते. आज जगतात आरंभशूर लोकांचा भरणा भरपूर प्रमाणात असल्यामुळे, दिवसागणिक अनेकानेक परंपरा निर्माण होतात व निर्मात्याबरोबरच अनंतात विलीन होतात. परंतु ज्या परंपरेमागे निर्मात्याचे निस्सीम प्रेम, ती तहहयात चालविण्यासाठीची अहोरात्र धडपड व तत्पश्चात टिकविण्यासाठी त्यांचा आशीर्वाद असला तरच ती परंपरा चिरंतन होत असते. उपरोक्त तिन्ही गोष्टीचा माऊलीच्या पालखी सोहळ्यात अंतर्भाव असल्यामुळेच तो दिवसेंदिवस वाढतच असून, आज रोजी तो महाराष्ट्राच्या आध्यात्मिक , सामाजिक व सांस्कृतिक वैभवात भर घालीत आहे. हा सोहळा वारकऱ्यांच्या स्वयं-शिस्त , सर्वस्व समर्पण व परस्पर सहकार्याच्या माध्यमातून जागतिक आश्चर्याचा केंद्रबिंदू बनून, त्याच्या माध्यमातून निरंतरपणे नि:स्वार्थी , भगवद् निर्भर व निरुपद्रवी समाजाची अव्यहात निर्मिती होत आहे. त्यातूनच सज्जन शक्ती संघटित होत सक्रिय होऊन, विश्वबंधुत्वाचा संदेश केवळ कीर्तना- प्रवचनातून नव्हे तर, स्वतःच्या सर्वानुकरणीय आचरणातून संपूर्ण विश्वाला देत, माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून केलेली विश्वशांती ची प्रार्थना वास्तवात उतरवितांना दिसून येतात. या वारीत सरकारच्या दृष्टिकोनातून पूरक अशी आर्थिक उलाढाल , सुदृढ समाज व्यवस्थेकरिता वैचारिक आदान – प्रदान व संस्कृतीच्या दृष्टीने सांस्कृतिक संक्रमण ह्या तिन्ही गोष्टी अगदी सहजतेने होऊन , त्यातून सरकारचा उत्कर्ष , समाजाचे उत्थान व संस्कृतीचे अभिवृद्धी अर्थातच तिघांचेही सहज संवर्धन होत आहे. म्हणूनच या सोहळ्याच्या चिरंतनत्वाकरिता सरकार, समाज व संस्कृती रक्षकांनी सदैव सक्रिय राहून, तन-मन-धनाने सहकार्य केले पाहिजे. वेदोपनिषदादि संस्कृत प्रचूर ग्रंथांचे तत्वज्ञान पचवून निर्माण झालेल्या, वारकरी संतांच्या लोकसुलभ मराठी वाङ्मयामुळे , या परंपरेची पाळमुळ शहरापासून गाव- खेड्यातील वाड्यावस्त्यांवरील तळागाळातील प्रत्येक सुज्ञ व अज्ञ आबाल वृद्धांपर्यंत खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळेच शेकडो वर्षापासून परकीय आक्रांत्याच्या त्सुनामीत , अनेक आर्थिक संकटाच्या भूकंपात व प्रदीर्घ गुलामगिरीच्या वादळांनाही न जुमानता महाराष्ट्रीयन आध्यात्मिक वैभववाचा हा वृक्ष अजस्त्र अर्थात महाकाय झाला आहे. या अवाढव्य वृक्षांने येथील राजकीय सत्तेला स्थैर्य , समाज व्यवस्थेला बळकटी व संस्कृतीला भरभराटी प्रदान केली. त्याच्याच सावलीत खेळत – बागडत आम्ही लहानाची मोठी होत आहोत याचाच आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे. त्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाला नवसंजीवनी प्रदान करणाऱ्या भगवान श्री ज्ञानोबा- तुकोबारायांच्या पालखी सोहळा प्रस्थान तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भू वैकुंठ पंढरपूर येथे भगवान पंढरीनाथांच्या दर्शनार्थ येणाऱ्या सर्व साधूसंतांच्या पालखी सोहळ्यांच्या निमित्याने ” प्रतिवर्षी पंढरपुरा l येती महाद्वारा हरी भेटी ll” त्या सर्व संतांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित. श्री ज्ञानेश्वरदासानुदास.श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी ( भैरवगढ )



