राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या महान नेत्यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा धारण करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जिवंत दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
त्यानंतर श्रेया पाचे, शौर्य म्हस्के, श्रद्धा डोंगरे, काव्या विग्ने , यश घुगे, तबशीर शेख, शरयू इंगळे आणि श्रेया देशमुख या विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी गांधीजींचे सत्य, अहिंसा व स्वच्छतेचे विचार तसेच शास्त्रीजींची साधी राहणी, प्रामाणिकपणा आणि देशसेवेची भावना यांचा प्रभावी शब्दांत उलगडा केला.
कार्यक्रमात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता नववीतील अर्णव कोठोडे आणि स्वराज गुसिंगे यांनी केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची प्रभावी मांडणी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व विशद केले. आपल्या मनोगतात त्यांनी महात्मा गांधी यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी हेच त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असे सांगितले. तसेच गांधीजींच्या “बोले तैसा चाले” या जीवनमूल्याचा उल्लेख करत, केवळ चांगले विचार मांडणे पुरेसे नसून ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, स्वच्छता आणि सेवाभाव यांसारखे गुण आपल्या जीवनात अंगीकारावेत, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



