ग्रामीण भागात पत्रकारांचे मोलाचे योगदान पाहता ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती करा; अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची मागणी!

आवाज न्यायाचा प्रतिनिधी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अकोला / तेल्हारा | विजय मनोहरराव घोडे
पत्रकार हे समाजातील विविध समस्या ,मागण्या शासन व प्रशासन दरबारी मांडत असतात त्याचबरोबर शासना कडून प्राप्त महत्वपूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य हे पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून ग्रामीण भागात तसेच सर्वत्र मोठ्या निर्भीडतेने जबाबदारी घेत उत्साहाने करत आहे. या बाबीची दखल घेत ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन नुकतेच तेल्हारा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर शासनामार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशासक पदावर स्थानिक पत्रकारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ‘अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, तालुका तेल्हारा’ यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन तेल्हारा तहसीलदार यांच्यामार्फत प्रशासनाला सादर करण्यात आले.
ग्रामीण भागातील पत्रकार गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व विकासात्मक समस्या तसेच नागरिकांचे प्रश्न वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अविरतपणे करत असतात. कोणत्याही मोबदल्याची किंवा मानधनाची अपेक्षा न ठेवता, केवळ सामाजिक बांधिलकी जपत गावाचा विकास व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार सदैव तत्पर असतात. याशिवाय, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यातही पत्रकारांचा मोठा वाटा असतो.
पत्रकारांचा हा दांडगा लोकसंपर्क व स्थानिक समस्यांची असलेली सखोल जाण विचारात घेता, ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करताना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
हे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे वरिष्ठ पदाधिकारी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, सरचिटणीस सुरेश साळवे, प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. या प्रसंगी पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले यांच्या मार्गदर्शनात देवकीनंदन माथारिया, धीरज बजाज, विकास दामोदर, गणेश सोनटक्के, सूरज चौबे, जावेद खान, गजानन राठोड, अर्जुन खिरोडकार, सदानंद खारोडे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



