सवना जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी :-सलमान पठाण
सवना (ता. चिखली) – चिखली तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळा, सवना येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रवेशोत्सवानिमित्त गावातून सजवलेल्या बैलगाडीतून तसेच फुग्यांनी सजवलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांची आनंदमय मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, आकर्षक रांगोळ्या आणि घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. शाळेच्या प्रवेशद्वारावर चिमुकल्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शिक्षणाच्या शुभ प्रवासाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षणाबाबत जनजागृती करत प्रत्येक बालकाने शाळेत प्रवेश घ्यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले.



