Uncategorized

भिलदुर्ग येथील महिलेच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : 13 सप्टेंबर
मालेगाव तालुक्यातील भिलदुर्ग गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेच्या हत्येचा उलगडा करताना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पांगरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर भिलदुर्ग वनपरिक्षेत्रातील एका टेकडीवर भिलदुर्ग गावातील एका 45 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास ठाणेदार संजय चौधरी करीत होते.
प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मालेगांव चे ठाणेदार संजय चौधरी, पोलिस उपनिरीक्षक दिलीप रहाटे, रवी सैबेवार, माधव पेटकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल नीलेश अहिर, सुनील पवार, किशोर चिंचोलकर, शिवाजी काळे, पोलिस कांस्टेबल गणेश मेटांगले, अमोल पवार, ज्ञानेश्वर सानप यांच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सहायक पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, प्रशांत राजगुरू रात्रीचा दिवस करत होते.
मात्र, पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, महिलेचा मृत्यू एक दिवस आधी म्हणजेच गुरुवार 5 सप्टेंबर रोजी झाला होता. मात्र गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे येत होते. अनेक संशयितांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करूनही पोलिसांना या प्रकरणात काहीही साध्य झाले नव्हते. ठाणेदार संजय चौधरी सातत्याने प्रयत्न करत होते, त्यांनी सहकाऱ्यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढत होते. याचदरम्यान, गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस हेडकॉन्स्टेबल नीलेश अहिर व पोलीस कॉन्स्टेबल केशव गोडघासे हे मेडशी बायपासवर गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याला मेडशी पोलीस चौकीत आणून चौकशी केली असता त्याने सत्य उघड केले. त्यानुसार त्याने आपले नाव संतोष अशोक जवळकर, वय 36, रा. मेहकर असे सांगत पुढे सांगितले की, गुरुवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी मी काही मित्रांसह शेतात जाऊन भिलदुर्ग गावातील महिलेला भेटलो. तेथे त्याच्या साथीदाराचा त्या महिलेशी काही कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने त्यांनी महिलेची हत्या केली. खून झाल्यापासून तो भीतीने इकडे तिकडे लपत फिरत होता. पोलिस हेडकॉन्स्टेबलने निलेश अहिर यांनी ही माहिती ठाणेदार संजय चौधरी यांना कळविताच त्यांनी तात्काळ मेडशी पोलिस चौकी गाठली, त्यांनीही आरोपीची चौकशी करून खात्री केली, त्यानंतर गुरूवारी रात्री 11 वाजता आरोपी संतोष अशोक जवळकर ला अटक करून मालेगांव ठाण्यात आणण्यात आले. शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. कोठडी दरम्यान या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळवून बाकी आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button