‘द टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ESFE चा मानाचा ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ श्रीमती नलिनी लहाने यांना प्रदान

मुंबईत हिवरखेडचा डंका!
हिवरखेड (विशेष प्रतिनिधी):
शिक्षणाची कोणतीही सीमा नसते आणि जिद्द असेल तर ग्रामीण भागातील शाळाही थेट राष्ट्रीय व्यासपीठावर आपली मोहर उमटवू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आकांक्षा शिक्षण संस्था हिवरखेड द्वारा संचलित वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल हिवरखेड रूप ता तेल्हारा जि. अकोला च्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी बंडू लहाने यांचा आज मुंबईतील झगमगत्या मंचावर ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचायझी एक्स्पो’ (ESFE) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात त्यांना अकोला जिल्ह्यातील ‘बेस्ट प्रिन्सिपल इन प्री-स्कूल’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
मुंबईतील गोरेगाव येथील प्रसिद्ध ‘नेस्को’ बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि वरिष्ठ संस्थाचालकांची मोठी उपस्थिती होती. संपूर्णपणे गुणवत्तेच्या कठोर निकषांवर आधारित या पुरस्कारासाठी जेव्हा श्रीमती नलिनी लहाने यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
पूर्व-प्राथमिक शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीमती नलिनी लहाने यांनी राबवलेले नो ब्लैक बोर्ड हा कल्पक उपक्रम, हसत-खेळत शिकण्याची आधुनिक पद्धत आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा यामुळेच या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाची मोहर त्यांच्यावर उमटली आहे. अकोल्याच्या हिवरखेडसारख्या ग्रामीण भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने मिळवलेले हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
“हा सन्मान माझ्या टीमचा आणि पालकांच्या विश्वासाचा!”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना श्रीमती नलिनी लहाने म्हणाल्या, “लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल हिवरखेड ची संपूर्ण टीम, विद्यार्थी आणि आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येक पालकाचा आहे.”
श्रीमती नलिनी लहाने यांच्या या ऐतिहासिक यशामुळे आकांक्षा शिक्षण संस्था हिवरखेड रूप च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याप्रसंगी केवल वसंतराव देशमुख अध्यक्ष शाळा विकास समिती हिवरखेड, डॉ मयूर लहाने सचिव यांच्या सह संपूर्ण हिवरखेड परिसरातून, अकोला जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.



