विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपअधीक्षक काशिनाथ भोईर यांचा प्रेरणादायी संवाद

भरोसा येथील जिल्हा परिषद शाळेत ११५ विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद; मार्गदर्शनानंतर खाऊचे वाटप
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा : शासकीय कर्तव्य बजावत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देण्याचा प्रयत्न भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक काशिनाथ भोईर यांनी केला. SIR कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भरोसा तसेच रामनगर केंद्र क्रमांक ४९ येथील शाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भोईर यांनी शिक्षणाचे महत्त्व, जीवनात ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज तसेच आपल्या आवडी-क्षमता ओळखून भविष्यात योग्य क्षेत्राची निवड करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आजचे विद्यार्थी हीच उद्याची समाजाची ताकद आहे,” या भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहित केले.
भरोसा येथील शाळेत यावेळी एकूण ११५ विद्यार्थी उपस्थित होते. अधिकारी म्हणून असलेला औपचारिकपणा बाजूला ठेवत भोईर यांनी विद्यार्थ्यांशी अगदी खेळीमेळीच्या आणि आपुलकीच्या वातावरणात संवाद साधला. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांकडून भोईर यांचा सत्कार
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक समाधान धोंडगे यांनी उपअधीक्षक काशिनाथ भोईर यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक अनिल दुतोंडे सर, विलास जवंजाळकर सर तसेच SIR टीमचे सहाय्यक संतोष क्षीरसागर, अनिकेत राठी, अश्विनी चौधरी आदी उपस्थित होते.
कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ठसा
SIRच्या कामकाजाच्या
सुरुवातीपासूनच काशिनाथ भोईर यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी गांभीर्याने स्वीकारून आपल्या कामाला प्राधान्य दिले आहे. शासकीय कर्तव्य पार पाडताना केवळ कार्यालयीन जबाबदारीपुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याची त्यांची कार्यपद्धती यावेळीही दिसून आली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या प्रश्नांना मिळालेली उत्तरे आणि भविष्यासाठी मिळालेले प्रोत्साहन, यामुळे भरोसा येथील शाळेतील हा संवाद विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
शासकीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला हा आपुलकीचा संवाद शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.



