दुष्काळग्रस्तांच्या समस्या ऐकून महसूल मंत्र्यांकडून तत्काळ कार्यवाही

रणथाम येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी; अचूक पंचनामे, वीजपुरवठा व शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांबाबत निर्देश
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. ३: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे हे शासनाचे प्राधान्य असून, केंद्र व राज्य शासनाच्या मदतीसह विविध योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
दुष्काळजन्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दुष्काळजन्य परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी मलकापूर तालुक्यातील रणथाम येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, शेतीतील अडचणी तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी व नागरिकांची निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ निर्देश
शेतकऱ्यांनी शेतीतील पिकांची स्थिती, नुकसान तसेच शेतातील केबल व विद्युत तारांच्या चोरीची समस्या महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याची तातडीने दखल घेत श्री. बावनकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतातील केबल व विद्युत तारांची चोरी रोखण्यासाठी तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना आवश्यक नकाशे तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. घरकुलांसाठी आवश्यक रेती उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही महसूल मंत्र्यांनी दिले.
दुष्काळग्रस्तांना मदत देताना पीक व नुकसानीचे पंचनामे अचूक असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून अधिकाधिक मदत मिळविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्याची कार्यवाही जलद, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देताना सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शेतकऱ्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे शेतकरी संकटात असला तरी शासन आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात खचून जाऊ नये. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार समाधान सोनवणे तसेच स्थानिक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
श्री क्षेत्र शेगाव येथे दर्शनाने दौऱ्याची सुरुवात
महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्हा दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाने केली. यावेळी त्यांनी सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली



