शास्त्रीय मराठीसाठी पुण्यात उत्कृष्टता केंद्र

केंद्र सरकारची मंजुरी; डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन व जतनाला चालना
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : शास्त्रीय भाषांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने पाच ‘Centre of Excellence’ (CoE) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये शास्त्रीय मराठीच्या अभ्यासासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (अभिमत विद्यापीठ) येथे उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या भाषा विभागाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, शास्त्रीय आसामी, शास्त्रीय बंगाली, शास्त्रीय मराठी, शास्त्रीय पाली आणि शास्त्रीय प्राकृत या पाच भाषांसाठी उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यास सक्षम प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
या केंद्रांच्या माध्यमातून संबंधित शास्त्रीय भाषांमधील शैक्षणिक संशोधन बळकट करणे, भाषिक वारशाचे डिजिटायझेशन व जतन करणे तसेच त्याचा प्रसार करणे, हा उद्देश असल्याचे ज्ञापनात नमूद करण्यात आले आहे.
यानुसार शास्त्रीय आसामीसाठी तेजपूर विद्यापीठ (आसाम), शास्त्रीय बंगालीसाठी विश्वभारती विद्यापीठ (पश्चिम बंगाल), शास्त्रीय मराठीसाठी डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (पुणे), शास्त्रीय पालीसाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशा (ओडिशा) आणि शास्त्रीय प्राकृतसाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात (गुजरात) येथे ही केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
शिक्षण मंत्रालयाच्या भाषा विभागाचे उपसचिव श्रेयांश मोहन यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी हे कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे.



