देऊळगाव महीत वरली-मटका जुगारप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथील बसस्थानक चौकात हॉटेल रजनीकांतसमोर सार्वजनिक ठिकाणी वरली-मटका जुगार खेळविल्याप्रकरणी सुभाष रतन कोठारी (वय ३०, रा. बसस्थानकाजवळ, देऊळगाव मही) याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी देऊळगाव मही बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना त्यांना सार्वजनिक ठिकाणी पैसे घेऊन वरली-मटका जुगाराच्या चिठ्ठ्या देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह कारवाई केली. कारवाईदरम्यान सुभाष कोठारी याला पकडण्यात आले.
त्याच्याकडून रोख १ हजार २४० रुपये, एक पेन आणि वरली-मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी असा एकूण १ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दिगंबर कपाटे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार कलीम शफी देशमुख करीत आहेत.



